

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये धारावीतून खळबळजनक निकाल समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १८३ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार आशा दीपक काळे यांनी शिवसेनेला (शिंदे गट) मोठा धक्का देत विजय मिळवला आहे. या विजयामुळे मुंबईत काँग्रेसने आपले खाते उघडले असून राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा रंगली आहे.
या निवडणुकीत शिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांच्या वहिनी वैशाली शेवाळे या शिवसेनेच्या (धनुष्यबाण) तिकीटावर रिंगणात होत्या. मात्र, धारावीच्या मतदारांनी आशा काळे यांच्यावर विश्वास दाखवत शेवाळे कुटुंबाला पराभवाचा धक्का दिला आहे.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत आशा काळे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. अंतिम आकडेवारीमध्ये आशा दीपक काळे (काँग्रेस): ५,४०६ मते, वैशाली शेवाळे (शिवसेना - शिंदे गट): ४,१६६ मते मिळाली. आशा काळे या १,४५० मतांनी विजयी झाल्या आहेत.
धारावीतील हा विजय काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबईतील निकालांमध्ये काँग्रेसने या विजयाद्वारे आपले पहिले खाते उघडले आहे. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाके फोडत आशा काळे यांच्या विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला. राहुल शेवाळे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या नातेवाईकाचा पराभव झाल्याने शिवसेनेसाठी हा मोठा सेटबॅक मानला जात आहे.