

Mumbai Woman Stalking: मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात पहाटेच्या सुमारास एका महिला बाइकरचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
‘alka.fit’ नावाच्या इंस्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून, ही घटना पहाटे साधारण 3 वाजण्याच्या सुमारास घडल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये संबंधित महिला सांगते की, एक अनोळखी व्यक्ती स्कूटरवरून तिचा वारंवार पाठलाग करत होती. त्यामुळे ती प्रचंड घाबरली आणि अस्वस्थ झाली होती.
महिलेच्या म्हणण्यानुसार, ती मरीन ड्राइव्ह परिसरातून जात असताना हा व्यक्ती तिच्या मागे येऊ लागला. काही वेळानंतर त्याने यू-टर्न घेत तिच्या बाइकसमोर स्कूटर उभी केली. सिग्नल हिरवा झाल्यानंतरही तो तिथेच थांबून तिच्याकडे पाहत असल्याचा आरोप तिने केला आहे.
व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने तिच्या आजूबाजूला फेऱ्या मारल्याचे आणि सतत तिच्यावर नजर ठेवत असल्याचेही दिसत आहे. “मला खूप असुरक्षित वाटत होतं. हे शब्दांत सांगणं कठीण आहे,” असं कॅप्शनही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
यानंतर तो व्यक्ती काही अंतरावर स्कूटर पार्क करून तिच्या मागे उभा राहिल्याचाही आरोप महिलेने केला आहे. ती संपूर्ण घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
अनेक नेटिझन्सनी मुंबई पोलिसांना टॅग करत या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. काहींनी महिलांनी रात्री प्रवास करताना सुरक्षा साधने जवळ ठेवावीत, असा सल्लाही दिला. तर काहींनी तातडीने पोलिस हेल्पलाइनला संपर्क साधण्याचे आवाहन केले.
एका युजरने “103 Nirbhaya Squad, 1091 Women Helpline आणि 100/112 हे नंबर लक्षात ठेवा,” असा सल्ला दिला. तर दुसऱ्या युजरने “अशा लोकांना धडा शिकवायला हवा,” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओबाबत मुंबई पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. तसेच या प्रकरणात औपचारिक तक्रार दाखल झाली आहे का, याबाबतही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.