

ठाणे : गेले अनेक दिवस चर्चेत असलेली आणि मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सहा महिन्यांपूर्वी ज्याची ट्रायल झाली ती बहुप्रतीक्षित मुंबई - कोकण रो- रो सेवा आता एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. हा प्रवास पाच तासांत पूर्ण होणार असून मुंबई भाऊ चा धक्का येथून सुटणारी रो-रो बोट पाच तासांत विजयदुर्गला पोहोचणार आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचा 12 तासांचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना गाडीसह गावी पोहोचणे शक्य होणार आहे.
मुंबई विजयदुर्ग प्रवास केवळ पाच तासांमध्ये करता यावा, यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळने मुंबई विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांचा विकास करून ही सेवा गणेशोत्सवादरम्यान, ऑगस्ट 2025 मध्ये सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र तांत्रिक अडचणी आणि काही परवानग्या न मिळाल्याने हा मुहूर्त चुकला आणि आता फेब्रुवारी 2026 उजाडले तरी मुंबई विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू झालेली नाही. पण आता मात्र ही सेवा सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा सागरी मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर महिनाभर रो-रो सेवेचे संचालन करण्यासाठी कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करण्याकरीता सागरी मंडळाने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या. ही निविदा प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये मुंबई विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू होऊ शके ल.
मुंबई-गोवा महामार्ग गेली 14 वर्षे रखडल्यामुळे या महामार्गाचा प्रवास 14 तासांचा आणि जिकरीचा झाला आहे. अनेक अपघातांमुळे या महामार्गाची ओळख अपघातग्रस्त महामार्ग अशी झाली आहे. मात्र आता प्रवाशांना रो-रो चा पर्याय उपलब्ध होणार आहे. सुरुवातील ही सेवा गणेशोत्सवात सुरू करण्याची घोषण मत्स्य आणि बंदर विकास मंत्र्यांनी केली होती. ती आता एप्रिलला सुरू होईल. आणि हापूस आंब्याच्या हंगामात चाकरमान्यांना गावी पोहोचणे शक्य होईल. या रो-रो सेवेचा आंबा वाहतुकीलाही मोठा फायदा होऊ शकेल.
सागरी मंडळाने मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अतिजलद करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय पुढे आणला. त्यानुसार मुंबई विजयदुर्ग दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जलमार्ग निश्चित करून विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रूपांतर रो-रो जेट्टीत करण्यात आले. आवश्यक त्या पायाभूत सुविधाही विकसित करण्यात आल्या. तर भाऊचा धक्का येथेही या सेवेसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या.ही सर्व कामे पूर्ण करून ऑगस्ट 2025 मध्ये, गणेशोत्सवाच्या तीन ते चार दिवस आधी ही सेवा सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते.
गणेशोत्सवात मुंबईहून रत्नागिरीला केवळ तीन तासांत, तर सिंधुदुर्गला पाच तासांत पोहोचता येणार असल्याने कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र गणेशोत्सव झाल्यानंतरही रो-रो सेवेला मुहूर्त मिळाला नाही. काही चाचण्या शिल्लक असल्याने आणि काही परवानग्या न मिळाल्याने सागरी मंडळाला रो-रो सेवा सुरू करता आलेली नाही. ऑगस्टनंतर सागरी मंडळाने सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अनेक मुहूर्त जाहीर केले. मात्र सर्व मुहूर्त चुकले आणि रो-रो सेवा कागदावरच राहिली. आता मात्र सागरी मंडळाने एप्रिलमध्ये ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा चालविण्यासाठी (संचालन) कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या आठवड्यात निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. एप्रिलपासून महिनाभर प्रायोगिक तत्वावर ही सेवा प्रथम सुरू होईल आणि ही सेवा यशस्वी ठरली तर कायमस्वरूपी रो रो सेवा सुरू ठेवण्यात येईल, असे सागरी मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
प्राथमिक अंदाजानुसार तिकीट दर खालीलप्रमाणे असू शकतात.
प्रवासी तिकीट (इकॉनॉमी) : 2,500 रुपयांपासून सुरुवात.
प्रिमीयम इकॉनॉमी : 4 हजार
बिझनेस क्लास : 7,500
फर्स्ट क्लास : 9 हजार
दुचाकी वाहन : सुमारे 1,000 रु.
सायकल : 600 रु.
चारचाकी वाहन : सुमारे 6,000 रु.
मिनी बस : 13 हजार रुपये
30 सीटर बस : 14 हजार 500 रु.
45 सीटर बस : 17 हजार रु.
मोठ्या बसेस 21 हजार
प्रवाशांसाठी इकॉनॉमी, बिझनेस आणि फर्स्ट क्लास असे प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध असतील, ज्यामुळे बजेटनुसार प्रवासाची निवड करता येईल.