Panvel Auto Driver Robbery: कर्जफेडीसाठी प्रवासी महिलेवर चाकू हल्ला; 48 तासांत रिक्षाचालक अटकेत
पनवेल : घेतलेले कर्ज फेडण्यासाठी, प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिची जबरी चोरी करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला अवघ्या 48 तासांच्या आत अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून शहरात खळबळ उडवणाऱ्या या घटनेचा छडा पोलिसांनी जलद गतीने लावला आहे.
11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास पिडीत महिला संगिता भोईर (रा. करंजाडे) या ऑटो रिक्षाने आपल्या घरी जात होत्या. सर्व्हिस रोडवर रिक्षा पोहोचताच चालकाने रिक्षा बंद पडल्याचे कारण सांगून ती थांबवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला संभ्रमात असतानाच रिक्षाचालकाने धारदार चाकू काढत त्यांच्यावर केले. या हल्ल्यात प्रवासी महिला गंभीर जखमी झाली, हल्ल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतली आणि त्यांना रस्त्यावर सोडून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर तत्काळ पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली, तांत्रिक विश्लेषण केले आणि साक्षीदारांची चौकशी केली. एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाल्याने तपासाला गती मिळाली. संबंधित रिक्षाच्या क्रमांकातील शेवटचे चार अंक साक्षीदाराने लक्षात ठेवले होते; मात्र सिरीज आणि कोड माहित नव्हता.
या मर्यादित माहितीवरून पोलिसांनी त्या चार अंकांवर आधारित सर्व रिक्षांचा शोध सुरू केला. संशयित रिक्षाचालकांची चौकशी करताना रिक्षाचा चालक अक्षय एकनाथ बागडे ( 27) याच्यावर संशय बळावला. कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्जाची परतफेड करण्यासाठी पैशांची गरज असल्याने हा गुन्हा केल्याचे त्याने प्राथमिक तपासात नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा जप्त केली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

