

मुंबई : जिल्हा परिषद निवडणुका व मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर 9 आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. या संदर्भात विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक जाहीर करत संलग्न महाविद्यालये, विभागप्रमुख, ठाणे व कल्याण उपकेंद्र तसेच दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रांना सूचना दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय यंत्रणा व मनुष्यबळ गुंतवावे लागणार असल्याने 9 व 10 फेब्रुवारी रोजी नियोजित असलेले सर्व पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यानुसार 9 फेब्रुवारीचे पेपर 24 फेब्रुवारीला, तर 10 फेब्रुवारीचे पेपर 25 फेब्रुवारी 2026 रोजी घेतले जाणार आहेत. मात्र, परीक्षेची वेळ मूळ वेळापत्रकानुसारच राहणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, 28 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे दुपारच्या सत्रातील वाणिज्य व व्यवस्थापन, कला व शिक्षण शाखेच्या काही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत होणारे हे पेपर आता 23 फेब्रुवारी 2026 रोजी, त्याच वेळेत व त्याच परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. सुधारित वेळापत्रकाची माहिती संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचवावी, असे निर्देश विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना दिले आहेत.