

मुंबई : रस्ता अपघात, औद्योगिक दुखापत किंवा स्ट्रोकनंतर रुग्णांवर शस्त्रक्रिया होते; मात्र उपचारानंतर पुन्हा पूर्वीसारखे काम करण्याची क्षमता मिळवणे हे मोठे आव्हान ठरते. ही पोकळी भरून काढण्यासाठी केईएम रुग्णालयात ‘ऑक्युपेशनल थेरपी, वर्क रेडीनेस अँड रिहॅबिलिटेशन युनिट’ सुरू करण्यात आले आहे.
या युनिटच्या माध्यमातून शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची केवळ शारीरिक सुधारणा नव्हे, तर त्याला पुन्हा कामासाठी सक्षम बनवण्यावर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांत ज्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो, ती सेवा केईएममध्ये मोफत उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला इनर व्हील क्लब ऑफ चेंबूर, अवॉन फाउंडेशन आणि किलाचंद देवचंद चॅरिटी ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले आहे.
ऑक्युपेशनल थेरपी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुशांत सारंग यांनी सांगितले की, या युनिटमध्ये प्रथम रुग्णाच्या कामाच्या स्वरूपाचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर कार्यक्षमतेचे मूल्यांकन, स्नायू बळकटीकरण व सहनशक्ती वाढवणे आणि शेवटी प्रत्यक्ष कामाशी सुसंगत प्रशिक्षण असे चार टप्प्यांत उपचार केले जातात.
पाठीच्या कण्याला दुखापत, फ्रॅक्चर, स्ट्रोक, अंगविच्छेदन, क्रश इंज्युरी, प्लास्टिक सर्जरीनंतरचे रुग्ण तसेच ऑटिझम व बौद्धिक अपंगत्व असलेले युवक यांना या युनिटचा थेट लाभ होणार आहे. गरज भासल्यास रुग्णांना फिटनेस प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
नर्सिंग विभागातील असोसिएट डीन डॉ. हेमंत नाडगावकर यांनी सांगितले की, या युनिटचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष कामाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. शिवण कामगारांसाठी शिवणयंत्र, वाहनचालकांसाठी ड्रायव्हिंग सिम्युलेटर, तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन, बस कंडक्टर, दुकानदार, संगणक ऑपरेटर आणि मजुरांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व्यवस्था उभारण्यात आली आहे. वजन उचलण्याची क्षमता मोजण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचाही वापर केला जाणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यक्ष कामाच्या वातावरणाचे अनुकरण करणारी ही सुविधा उभारण्यात आली आहे. यामुळे रुग्ण उपचारानंतर सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने पुन्हा कामावर परतू शकतील. रुग्णांना स्वावलंबी बनवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज