Harbour Line Block
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी शनिवारी दुपारी 1 ते रविवारी मध्यरात्री 1 दरम्यान पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पश्चिम रेल्वेवरील सुमारे 162 अप आणि डाऊन लोकल फेर्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच रविवार मध्य रेल्वेवर मेन आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांसाठी शनिवार व रविवारचा लोकल प्रवास मोठा खडतर असणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील 36 तासांच्या ब्लॉकमुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत पश्चिम रेल्वेवरील सुमारे 162 अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. काही लोकल सेवा आणि मेल, एक्स्प्रेस जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील 30 आणि 31 मे रोजी सुटणारी गाडी क्रमांक 19418 अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोड येथे रद्द करण्यात येईल. त्यामुळे ही रेल्वेगाडी वसई रोड आणि बोरिवलीदरम्यान धावणार नाही. 31 मे आणि 1 जून रोजी सुटणारी गाडी क्रमांक 19425 बोरिवली-नंदुरबार एक्स्प्रेस भाईंदर येथे रद्द करण्यात येईल.
त्यामुळे ही रेल्वेगाडी बोरिवली आणि भाईंदरदरम्यान धावणार नाही. 31 मे रोजी सुटणारी गाडी क्रमांक 19426 नंदुरबार-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोड येथे रद्द करण्यात येईल. त्यामुळे ही रेल्वेगाडी वसई रोड आणि बोरिवलीदरम्यान धावणार नाही. 1 जून रोजी सुटणारी गाडी क्रमांक 19417 बोरिवली-अहमदाबाद एक्स्प्रेस बोरिवलीऐवजी वसई रोडवरून सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणार्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 पर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणार्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते संध्याकाळी 4.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणार्या अप हार्बर लाईन सेवा बंद राहतील. ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 पर्यंत सुटणार्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 पर्यंत विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.