Versova Vasai Coastal Road
मुंबई : वर्सोवा ते वसईदरम्यान प्रस्तावित असलेल्या कोस्टल रोडचा मार्ग बदलण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
वर्सोवा ते उत्तन, उत्तन ते वसई हा कोस्टल मार्ग उत्तन गावाजवळील समुद्रातून गेला तर कोळी बांधवांच्या मासेमारीवर संकट येण्याची शक्यता आहे. हा कोस्टल रोड उत्तन गावाजवळील समुद्रातून न करता वर्सोवा ते दहिसर मार्गे आणावा, असे सरनाईक म्हणतात.
मरीन लाईन्स ते वरळी, वरळी ते वर्सोवा, वर्सोवा ते उत्तन, उत्तन ते वसई व पुढे वाढवण बंदरापर्यंत कोस्टल रोड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एम.एम. आर. क्षेत्रातील भविष्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच मीरा-भाईंदर व वसई-विरार या महानगरपालिका जवळ आणण्याकरिता व वाढवण बंदराच्या निर्मितीनंतर मोठ्या प्रमाणावर होणार्या वाहतुकीचा विचार करून हा कोस्टल रोड उभारला जात असला तरी त्यामुळे मच्छीमार कोळी बांधवांवर या प्रकल्पाने संकट ओढवले आहे.ते टाळण्यासठी राज्य सरकार कोस्टल रोडचा मार्ग बदलते का, याकडे समस्त कोळी बांधवांचे लक्ष लागून आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका परिसर पूर्णतः मच्छीमार कोळी बांधवांचा असल्याने या परिसरातील सर्वसामान्य कोळी बांधवांचा उदरनिर्वाह हा मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे.
वर्सोवा ते उत्तन, उत्तन ते वसई हा कोस्टल मार्ग उत्तन गावाजवळील समुद्रातून न करता वर्सोवा ते दहिसर मार्गे आणावा. त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दहिसर ते सुभाषचंद्र बोस मीरा-भाईंदर हा 60 मीटरचा रस्ता गेल्या सरकारच्या कार्यकाळात मंजूर करून घेतला असून त्याचे कामही चालू आहे.
या 60 मीटर रस्त्याला वर्सोवा ते दहिसर हा कोस्टल रोड जोडल्यास सुभाषचंद्र बोस मैदानावरून भाईंदर मार्गे वसई-विरारला नेल्यास राज्य शासनाच्या खर्चातही बचत होईल. तसेच काळी बांधवांच्या मत्स्य व्यवसायावर जे संकट येणार आहे तेही दूर होईल.
सबब उत्तन मार्गे जाणारा हा कोस्टल रोड रद्द करून तो वर्सोवा ते दहिसर मार्गे स्थलांतरित करून कोळी बांधवांची समस्या दूर करावी, अशी मागणी सरनाईक यांनी या पत्राद्वारे केली आहे.