

Unregulated Play Schools
नेरुळ : जून महिन्यात बच्चे कंपनीच्या प्ले स्कूलची सुरुवात होईल. प्ले स्कूल आणि पाळणाघर प्रवेशासाठी शासनाचे कोणतेच धोरण नसल्याने पालकांकडून वारेमाप फी घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेरुळ, सानपाडा पाम बीच, ऐरोली, वाशी या ठिकाणी प्ले स्कुलची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे अशा संस्थाचालकांवर शासनाने बंधने आणावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.
नवी मुंबईतील गल्ली-बोळात प्ले स्कूलचा सुळसुळाट झाला आहे. मे-जून महिन्यात प्ले स्कूलच्या जाहिराती झळकतात. त्याचा गैरफायदा घेऊन नवी मुंबईतील ठिकठिकाणी शेकडोंच्या संख्येत प्ले स्कूल थाटण्यात आली आहेत.
त्याद्वारे सुविधांच्या नावाखाली पालकांकडून लाखो रुपये लुटण्याचे काम संचालकाकडून केले जाते आहे. नवी मुंबईत नोकरी करणार्या दाम्पत्याची संख्या लक्षणीय आहे. त्यामुुळे अशा दाम्पत्यांना मुलांना पाळणाघरात ठेवण्याशिवाय पर्यायच नाही. गेल्या काही वर्षांत शेकडोंच्या संख्येने प्ले स्कूल आणि पाळणाघर सुरू झाली आहेत.
पाळणाघराची फी महिना किमान चार हजार आहे. तसेच साखळी सिस्टीममध्ये असलेल्या नामांकीत प्ले स्कूलमध्ये वार्षिक एक ते दीड लाख रुपये पॅकेज आहे. नामांकीत प्ले स्कूलमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा आले असून त्याची एक लिंक पालकांना स्मार्टफोनवर दिली जाते. त्या माध्यमातून आपल्या मुलावर पालकांना लक्ष ठेवणे सोयीस्कर होते. नवी मुंबईतील किती पाळणाघरे किंवा प्ले स्कूल आहेत याची आकडेवारी नवी मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयांकडे उपलब्ध नाही.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असणार्या प्ले स्कुल, पाळणाघराबाबत शासनाची नियमावली नाहीत. मात्र, लहान मुलांवर या ठिकाणी काही प्रसंग ओढवला तर संबंधित पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करावा.
प्रा. अरुणा यादव, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई मनपा