मुंबई : घरखर्चावरुन होणार्या भांडणातून रागाच्या भरात एका तरुणाने त्याच्याच वृद्ध आईची बेदम मारहाण करुन हत्या केली. हल्ल्यात जखमी झालेल्या साधना भोलेनाथ कारंडे या ६२ वर्षांच्या महिलेचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बांगुरनगर पोलिसांनी आता आरोपी मुलगा अभिषेक भोलेनाथ कारंडेवर (२८) हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
साधना तिच्या पती आणि मुलांसोबत गोरेगाव येथील लक्ष्मीनगर, महाकाली मंदिरामागील पुर्नवासी गल्लीतील रुम क्रमांक सातमध्ये राहत होती. गेल्या वर्षी तिला अर्धांगवायू झाल्याने ती घरीच असते. तिचा मोठा मुलगा प्रथमेश हा राजस्थान येथे राहत असून अभिषेक हा तिचा लहान मुलगा आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यातून तो घरात शिवीगाळ करुन सर्वांशी वाद घालण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या आठवड्यात प्रथमेश दिवाळी सणानिमित्त मुंबईत आला होता.
८ नोव्हेंबरला त्याचे वडील भोलेनाथ हे जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी ९ नोव्हेंबरला प्रथमेश हा त्याच्या मुलीसोबत गोरेगाव रेल्वे स्थानकात शॉपिंगसाठी गेला होता. रात्री घरी आल्यानंतर त्याला त्याची आई साधना ही रक्ताच्या थारोळ्यात घरी पडल्याचे तसेच तिच्या शेजारी अभिषेक हा दारुच्या नशेत झोपल्याचे दिसून आले. चौकशीनंतर घरखर्चावरुन अभिषेकने साधनाला बेदम मारहाण केली. तिचे डोके आपटून जखमी केले होते. त्यामुळे त्याने तिला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले.
बेशुद्धावस्थेत असल्याने तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रथमेश कारंडे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अभिषेकविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दुसरीकडे शुक्रवारी उपचारादरम्यान साधना कारंडे हिचा ट्रॉमा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे अभिषेकविरुद्ध आता हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच गुन्ह्यात त्याला शनिवारी पुन्हा बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. क्षुल्लक घरखर्चावरुन मुलाने वृद्ध आईची हत्या केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.