

कोपरखैरणे : सायबर भामट्यानी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) नवी मुंबईतील ग्लोबल आयटी सेंटरमध्ये सायबर घुुसखोरी केल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात बँकेच्या YONO 2.0 आणि RAAS या दोन महत्त्वाच्या ॲप्लिकेशन्समधील सुमारे ३ लाख ७५ हजार नोंदी हॅक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजून १३ मिनिटांपासून १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा प्रकार घडला. सीबीडी बेलापूर येथील सेक्टर ११ येथील एसबीआयचे ग्लोबल आयटी सेंटर आहे. या केंद्रातील सर्व्हरमध्ये अज्ञात व्यक्तींनी अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे (हॅक )तक्रारीत म्हटले आहे.
चोरी केलेली माहिती डार्क वेबवर प्रसारित केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. बँकेच्या महत्त्वाच्या आयटी केंद्रातच घुसखोरी झाल्याने डिजिटल बँकिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हॅक झालेला डेटा डार्क वेबवर प्रसारित झाल्याचा आरोप करण्यात आला असला, तरी त्यामध्ये नेमकी कोणती माहिती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्राहकांचे बँक खाते क्रमांक, पासवर्ड किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती चोरीला गेली आहे का, याचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
एसबीआय अधिकाऱ्याची तक्रार; पोलिसांकडून तपास
एसबीआयचे अधिकारी भावेश नेहरू निकम यांनी याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२), ६९(२), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ४३(अ), ४३(ब), ४३(क), ६६, ६६(सी), तसेच भारतीय दंड संहितेतील कलम ३७९ आणि १२०(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या सायबर हल्ल्यात एस बी आयचे ऍप असणाऱ्या YONO 2.0 आणि RAAS या दोन ॲप्लिकेशन्सशी संबंधित माहिती चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामध्ये ३२ सीएसव्ही (CSV) फाइल्समधील एकूण तीन लाख ७५ हजार नोंदींचा समावेश आहे. याशिवाय दोन जेएसओएन (JSON) फाइल्स आणि दोन हजार ७२१ पीडीएफ फाइल्सही अनधिकृतपणे मिळविण्यात आल्याचे म्हटले आहे.पीडीएफ फाइल्सपैकी दोन हजार ६३ फाइल्सची हॅश मूल्ये स्वतंत्र असल्याचे, तर ६५८ फाइल्स बनावट असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सायबर हल्ल्यामागे ‘Siriusim’ या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती किंवा हॅकर समूह असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 64.105.72.172 या आयपी पत्त्याचा वापर करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे. या माध्यमातून बँकेच्या डिजिटल यंत्रणेतील महत्त्वाची माहिती मिळवून ती बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे.
एस बी आय सर्व्हर मधील सुमारे ३ लाख ७५ हजार नोंदी चोरी गेल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. हे कोणी केले याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्ता सखोल माहिती देणे घाईचे ठरेलं. आमचा तपास सुरु आहे
अमित काळे पोलीस उपायुक्त