

मुंबई : चित्रपट पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ४९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा करार करण्यात आला. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे आणि महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
दादासाहेब फाळके चित्रनगरी ही चित्रपट निर्मितीची भूमी तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. चित्रपट पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगार, निवास, वाहतूक, खानपान, हस्तकला आणि स्थानिक संस्कृतीला नव्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः ग्रामीण आणि अपरिचित पर्यटनस्थळांच्या विकासाला यामुळे गती मिळणार आहे.
महाराष्ट्राला भारतातील अग्रगण्य चित्रपट पर्यटन केंद्र आणि जागतिक चित्रपट चित्रीकरण केंद्र म्हणून विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे, असे विकास पानसरे यांनी सांगितले, तर चित्रपट पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चित्रीकरण स्थळांना व्यापक ओळख मिळवून देण्याबरोबरच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि स्थान व्यवस्थापकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर राहणार आहे. राज्यातील विविध चित्रीकरण स्थळांची माहिती देश-विदेशातील चित्रपट क्षेत्रापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले.
पाच वर्षांच्या सामंजस्य कराराअंतर्गत 'महाराष्ट्र चित्रपट पर्यटन' या स्वतंत्र बँडची निर्मिती करून त्यासाठी एकसमान दृश्यात्मक ओळख विकसित करण्यात येणार आहे. या ब्रँडचा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पर्यटनविषयक बाजारपेठा, प्रदर्शन आणि रोड शोजच्या माध्यमातून संयुक्तपणे प्रचार करण्यात येणार आहे. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशाबाहेरील महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यावर भर राहणार आहे.