

मुंबई : मुंबईकरांना सध्या हवा प्रदूषणाचा चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. सोमवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 204 इतका होता. मंगळवारी हाच आकडा 172वर आला. एक्यूआयमध्ये 24 तासांत 32 अंकांनी घट झाली.
मुंबईतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक रविवारी 184 इतका होता. सोमवारी त्यात 18 अंकांनी वाढ झाली. मंगळवारी एक्यूआय पुन्हा दोनशेच्या आत आला. 151 ते 200 दरम्यानचा एक्यूआय हा आरोग्यासाठी घातक हवेची कॅटेगरीमध्ये मोडतो.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सक्रिय असलेल्या 23 आयएमडी स्टेशन्सपैकी. मंगळवारी जुहू तारा हे सर्वात प्रदूषित असल्याचे दिसून आले. येथील एक्यूआय 195वर आला तरी सोमवारच्या (242) तुलनेत त्यात खूपच घट पाहायला मिळाली. हिरानंदानी गार्डन, पवई येथील (239-182) प्रदूषणात कमालीची सुधारणा झाली. चेंबूर येथील डॉ. आंबेडकर नगर (235-175) आणि गोवंडीतील (225-164) हवेचा दर्जाही सुधारला.
प्रदूषणाच्या वरील हॉटस्पॉटसह वडाळा (217-185), कुर्ला (214-169), तसेच मालाड- पश्चिम (209-170), मराठा कॉलनी, विलेपार्ले (209-170), वरळी (209-176) तसेच चकाला, अंधेरी येथील (201-173) एक्यूआयमध्येही मोठी घट झाली. दरम्यान, मंगळवारीही मुंबईचे किमान तापमान विशीखाली कायम होते.
सांताक्रूझ वेधशाळेत मंगळवारी किमान 19 आणि कमाल 32 अंश सेल्सिअस इतके होते. सोमवारच्या (19/31 अंश सेल्सिअस) तुलनेत केवळ कमाल तापमानात थोडी घट झाली. बुधवारपासून (20/31 अंश सेल्सिअस) किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.