

मुंबई : मुंबई महानगरपालिका सभागृह व अन्य समित्यांमध्ये गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात बोलणारे भाजपाचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भाजपात दाखल झाल्यामुळे राजकीय वैरी आता मित्र बनले आहेत. हे सर्वजण एकाच पक्षाच्या छताखाली आल्यामुळे त्यांचा सूरही एकमेकात मिसळला आहे.
मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेता रवी राजा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आता एकरूप झाले आहेत. 2017 ते 2022 या पाच वर्षात या दोन्ही वरिष्ठ माजी नगरसेवकांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सभागृहात व स्थायी समितीत लावून धरत होते. त्यांनी भाजपाच्या विरोधात शेकडो वक्तव्य केली आहेत. अनेकदा सभात्याग करून विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
पण आता रवी राजा व राखी जाधव भाजपावासी झाले आहेत. राजा यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) या पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी नुकताच भाजपा प्रवेश करीत तिकीट मिळवले आहे. त्यामुळे आता या विरोधकांचा सुरही भाजपामय झाला आहे.
भाजपाने या दोन्ही ज्येष्ठ माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हे दोघेही निवडून आल्यास भाजपच्या बाकावर बसले तर नवल वाटायला नको. एवढेच काय तर आतापर्यंत आपण भाजपाच्या विरोधात बोलताना या दोघांना पाहिले होते. परंतु आता यांना भाजपाची भूमिका मांडावी लागणार आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या महापालिकेमध्ये भाजपा नगरसेवक व रवी राजा, राखी जाधव यांच्यामध्ये डबलबारीचा सामना पाहायला मिळणार नाही.
भाजपामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी राजा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव व मातोश्रीच्या अगदी खास मर्जीतील असलेल्या दहिसरच्या विनोद घोसाळकर कुटुंबातील सुनबाई तेजस्विनी घोसाळकर भाजपात आल्यामुळे मुंबई भाजपा आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे सेना बनली आहे.