

वाशी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात तिकीट वाटपावरून असंतोष उफाळून आला आहे.
ऐरोली येथील माजी नगरसेवक संजू वाडे यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी तिकीट कापल्याचा आरोप केला आहे. प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवण्याची तयारी असतानाही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
संजू वाडे सन 2015 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेतील विभाग अधिकारी पदाची नोकरी सोडून ऐरोली सेक्टर 2 येथून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून अहोते. त्यामुळे त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार निवड समितीने आपल्याला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप वाडे यांनी केला आहे.
बहुजन समाजाचा नवी मुंबईतील आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून, पक्षातील काही नेत्यांच्या दबावाखाली निर्णय घेण्यात आले, असा घणाघातही त्यांनी केला. त्यांनी बंडखोरीची भूमिका घेतली असून, त्यांच्या पत्नी व मुलांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.