

डी. अमोल
भारतामध्ये हिमालयाच्या पर्वतरांगांबरोबरच पश्चिम घाट आणि कोकण समुद्र किनारपट्टी हा भाग जैवविविधतेतील महत्त्वाचा जागतिक हॉटस्पॉट आहे. त्यात कोकण आता ‘बर्डिंग हॉटस्पॉट’ बनू लागला आहे. पक्ष्यांच्या संशोधनासाठी भारताच्या पर्यावरण विभागाने काही संशोधन पथके नेमली आहेत. त्यामुळे पालघर, ठाणे, रायगड, तळकोकणात विशेषत: सिंधुदुर्गात पर्यटन समृद्धीच्या दृष्टीने तसेच पक्षी प्रेमींसाठी ही खुशखबर म्हणायला हवी. कोकण किनारपट्टीवर किमयागार पंखावरचे भरारते जग नक्कीच जगाला हेवा वाटावा असे आहे.
महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फणसाड, पेंच या अभयारण्यापाठोपाठ तानसा अभयारण्य पक्षीनिरीक्षक व निसर्गप्रेमींच्या पसंतीस उतरले आहे. बगळा, चातक यांच्याबरोबरच हिवाळ्याच्या मोसमात तानसा जलाशय परिसरात मुक्कामी असलेले विदेशी पक्ष्यांचे थवे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या 320 चौरस किलोमीटर क्षेत्रात एकूण 212 पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत. त्यातील 55 पक्षी तानसा तलावाच्या परिसरात मुक्कामी आहेत. तानसाच्या घनदाट जंगलात पावश्या, भृंगराज, कोतवाल, कोकीळ, हळद्या, नाचन, घुबड, पिंगळ्या, खारीक टक्कोचोर, सुतार, टिटवी खंड्या, दयाळ, लाव्हे, तिथर, शिकरा, धोबी, पित्ता, गरुड, घार, सादबहीण, करकोचा, पोपट, मोर आदी विविध पक्षी तानसा अभयारण्यात वास्तव्य करत आहेत. काही दुर्मिळ असलेले विदेशी स्थलांतरित पक्षी भातसा, तानसा, वैतरणा या परिसरातील घनदाट जंगलात मुक्कामी आहेत. तानसाच्या जंगलात वेगवेगळ्या रंगाचे पक्षी खास हिवाळ्यात सध्या पक्षीनिरीक्षक व निसर्गप्रेमींना साद घालत आहेत.
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या 12 किलोमीटरवर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. 12.155 चौरस किलोमीटरच्या या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे हे माहेरघर आहे. आपण येथे 147 प्रजातींचे पक्षी पाहू शकतो. त्यात 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, उझ्बेकिस्तान, सैबेरियातून पक्षी येथे येतात. मात्र आता या अभयारण्याच्या शांततेसाठी काही प्रयत्नांची आवश्यकता आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्याचा खूपसा भाग दक्षिण दमट मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला आहे, तर दऱ्याखोऱ्यातील नाल्यालगतच्या खोलगट भागात अल्प प्रमाणात सदाहरित नदीकाठची वने आहेत. यात विविध प्रकारच्या 642 वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मीळ वनस्पती अस्तित्वात आहेत. या जंगलाचे संवर्धन झाले तर या महानगरासाठी ती मोठी गोष्ट ठरेल.
कोकणच्या सागरी पक्षांमधील महत्त्वाचे आकर्षण सी-गल आहे. या पक्षांचा हजारो किलोमीटर स्थलांतर करून येण्याचा प्रवास अनेकदा अद्भूत वाटतो. अनेक पक्षी ऋतू बदलताच मूळ प्रदेश सोडून इतरत्र जातात व काही काळ घालवून मायदेशी परततात. आकाशात झेप घेऊन विलोभनीयतेचे सुखद दर्शन देणारे ‘सी-गल’ पक्षी त्यापैकीच एक. भारताच्या सीमेवर असणाऱ्या ‘लडाख’ मधून हजारो ‘सी-गल’ पक्षी कोकणच्या समुद्र किनारपट्टीवर शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येतात, त्यावेळी कोकणचे समुद्र किनारे पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जातात.
मुरुड-जंजिरा शहरानजीक असणाऱ्या समुद्रकिनारी राजवाड्याजवळ सकाळच्या प्रहरी थव्याने आकाशात झेप घेणारे ‘सी-गल’ वातावरणाचे रूपच पालटून टाकतात. लाड भडक चोच, लाल पाय, पांढरे शुभ्र पिसांनी वेढलेले शरीर मनाला मोहरून टाकते. लडाखमध्ये बर्फवृष्टीच्या काळात पक्ष्यांना खाद्य मिळणे कठीण होते. शिवाय प्रजननास परिसर अनुकूल नसतो. त्यामुळे हजारोंच्या संख्येने हे पक्षी कोकणासह अन्य भागात वास्तव्यास येतात. फेब्रुवारी महिन्यात हे पक्षी अंडी घालण्यासाठी मायदेशी परततात. लडाख ते कोकण शेकडो किलोमीटरचे अंतर ते एकाच उड्डाणात पूर्ण करतात. पक्ष्यांचा प्रवास हा ऋतुमानानुसार अन्न व प्रजनन अनुकूल क्षेत्रापर्यंत जाण्याचे साहसी अभियानच असते. जगभरात पक्ष्यांच्या 9 हजार प्रजाती आढळतात. पैकी 1225 प्रजाती भारतात आढळतात. स्थलांतर करणारे पक्षी 15 हजार कि.मी.चे अंतर साधारण: 3 महिन्यांत ताशी 20 ते 25 कि.मी. प्रमाणे कापतात.
आता पक्ष्यांच्या जाती आणि त्यांचे संशोधन केंद्रीय पर्यावरण विभागाने सुरू केल्याने कोकणात समुद्र किनारी आणि सह्याद्री पर्वत रांगात नवी पक्षी अभयारण्ये संरक्षित होतील असे संकेत मिळत आहेत.
इको सेंन्सिटिव्ह झोनच्या माध्यमातून पश्चिम घाटाला जोडून असलेल्या 2 हजार गावांमध्ये हा झोन जाहीर झाला आहे. त्याला जोडून नवे संरक्षित क्षेत्र घोषित होईल. निसर्गातील दुर्लक्षित आणि नामशेष होत असलेल्या पक्ष्यांच्या संशोधनासाठी मिनिस्ट्री ऑफ एनवोर्मेन्ट कोईमतुर यांच्यामार्फत दोन महिलांचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झाले असून या पथकाद्वारे पालघर ते सिंधुदुर्ग असा या बर्ड डायव्हर्सिटीचा अभ्यास केला जात आहे. हे पथक गेली दीड वर्षे याबाबतचा अभ्यास करत असून विशेषतः इंडियन स्वीट पक्षी म्हणजेच पाकोळी पक्षाच्या अस्तित्व, निवासाचा शोध आणि अभ्यास करत आहे. या पथकाकडून 2006 पासून पाकोळी या म्हणजेच इंडियन स्वीट पक्षाचे संशोधन हाती घेतले आहे.
या पक्ष्यांची संख्या, या पक्षांचे निवास याचे संशोधन नेचर सर्वे सेंटरद्वारे केले जात आहे. हा पक्षी केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्येही सापडतो. महाराष्ट्रात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यातील निवती रॉक येथे या पक्षाच्या वास्तव्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. या पक्षाची थंड हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. त्यामुळे या पक्ष्यांचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे. या पक्षाला इंडियन स्विफ्ट म्हटले असले तरी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये या पक्षाला पाकोळी असे संबोधन केले जात आहे. या पक्षाच्या निवासासंबंधी अभ्यास या पथकाकडून केला जात आहे. कोकणच्या अनेक डोंगरभागात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पक्षी असून या रंगीबेरंगी विविध आकाराच्या पक्ष्यांच्या माध्यमातून पर्यटनाला मोठा वाव मिळत आहे. लांब शेपटाच्या आकर्षक पक्ष्यांच्या जाती या भागात आहेत.
पक्षी मित्रांद्वारे या पक्ष्यांचे निरीक्षण करून पर्यटकांना त्या पक्ष्यांची माहिती दिल्यास निसर्ग पर्यटनात मोठी वाढ होऊ शकते. यादृष्टीने तज्ज्ञ पथकाकडून संशोधन होणे काळाची गरज आहे.