

Mumbai News:
मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या आवारात असलेले मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या महापौर बंगल्याच्या दुरूस्तीसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून ३ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. या कामामध्ये इटालियन मार्बल्सचा वापर होणार असल्याने खर्चामध्ये वाढ झाली आहे. सदर दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजूरीसाठी बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे सादर करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेत साडे तीन वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपल्यानंतर नगरसेवकांचा कार्यकाळ सुरु झाला आहे. भाजपाच्या महापौर रितू तावडे या विराजमान होवून चार महिने उलटली, मात्र भायखळा येथील असलेला महापौर बंगला नादुरूस्त आणि दुरावस्थेत असल्याने त्यांनी सदर बंगल्यात जाणे नापसंद केले होते. यामुळे प्रशासनाकडून बंगला दुरूस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर महापौर रितू तावडे यांचा मुक्काम हा भायखळा येथील महापौर बंगल्यात होण्याची आशा निर्माण झाली आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या आवारात असलेल्या महापौर बंगला एक मजली इमारत, लाकडी संरचनेमध्ये आहे. महापौर रितू तावडे यांनी गेल्या महिन्यात सदर बंगल्याची पाहणी करून बंगल्याच्या अंतर्गत दुरूस्त्या व नुतनीकरणासंबंधीत कामे सुचविली होती. त्यानुसार आता प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
(१) बंगल्याच्या अंतर्गत फर्निचरची पूर्णतः दुरुस्ती करणे
(२) सर्व शौचालयांचे नवीन टाईल्स, फिक्सचर्स, प्लंबिंग बसवून नुतनीकरण करणे.
(३) पहिल्या मजल्यावरील बेडरूमसाठी अतिरिक्त शौचालयाची व्यवस्था करणे.
(४) तळमजल्यावर अतिरिक्त बेडरूमची व्यवस्था करणे.
(५) पुरातन पद्धतीची झुंबर व प्रकाशयोजना करणे.
(६) तळमजल्यावरील सभागृहाचे बैठकीच्या खोलीमध्ये रूपांतर करणे.
(७) अत्याधुनिक सोयीसुविधांसह स्वयंपाकगृहाचे पूर्णपणे नुतनीकरण करणे.
(८) तळमजल्यावर इटालियन मार्बलने संपूर्ण फरशीचे नुतनीकरण करणे.
(९) पुरातन पद्धतीचे क्लॅडिंग लावणे.
(१०) तळमजल्यावर अतिरिक्त शौचालय बांधणे.