

मुंबई : कबड्डी हा एक भारतीय सांघिक खेळ असून, ज्याचा उगम महाराष्ट्रात झाला. हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये कबड्डी खेळाडूंसाठी अल्प दरात मैदाने उपलब्ध करून द्या, असा ठराव मुंबई महापालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुढील अंमलबजावणीसाठी हा ठराव पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
कबड्डीची पंढरी म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करुन, क्रीडा क्षेत्रात भारत देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कबड्डी या खेळाकरिता विशेष प्राधान्य दिले गेले आहे. मुंबईतील मध्यमवर्गीय आणि गिरणगावातीत अनेक खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु मुंबईत मैदानांची संख्या कमी होत असून, मैदानांच्या कमतरतेमुळे कबड्डी स्पर्धावर गंभीर परिणाम होत आहे. योग्य मैदानांअभावी खेळाडूंच्या कौशल्यात अडथळा, सरावाचा अभाव दिसून येत असल्याची ठरवायची सूचना शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापालिका सभागृहात मांडली.
पारंपरिक अशी मातीतील कबड्डी कमी होऊन, व्यावसायिक आणि कृत्रिम मॅटवर होणाऱ्या स्पर्धामध्ये वाढ झाली आहे. आक्रमकता, चपळाई, शरीराची लवचिकता आणि ताकद वाढविण्यासाठी लागणारा नैसर्गिक सराव मैदानांअभावी कमी होत आहे. मैदानांचा अभाव हा स्थानिक खेळाडूंचे मनोबल कमी करीत आहे. मुंबई शहर व उपनगरांतील कबड्डी संघटनांना खाजगी जागांवर या खेळाच्या स्पर्धा भरविणे खर्चिक असते. त्यामुळे अशा स्पर्धा कमी प्रमाणात आयोजित केल्या जातात. यासाठी खेळाची मैदाने कबड्डी स्पर्धांकरिता अल्प दरात उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी पडवळ यांनी यावेळी केली. याला सभागृहात सर्व पक्ष नगरसेवकांनी पाठिंबा देत, एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
महापालिका सभागृहात मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी कधी करावी, ही सर्वस्वी महापालिकेचे प्रमुख म्हणून पालिका आयुक्तांची जबाबदारी आहे. त्यामुळे पालिका आयुक्त याबाबत आपला निर्णय कधी घेणार याकडे कबड्डीपटूंचे लक्ष लागले आहे.
मुंबईत कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी मोक्याची जागा मिळणे मोठे आव्हान असते. महापालिकेने अल्पदरात मैदाने उपलब्ध करून दिल्यास कबड्डी असोसिएशनसह आयोजकांना फायदा होईल. पालिकेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
राजेश पडेलकर, मुख्य कार्यवाह मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनर