

मुंबई : आत्मनिर्भर विकसित भारताच्या दिशेने झेपावणाऱ्या केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईच्या पदरात थेट आणि ठोस काही पडले नसले तरी या अर्थसंकल्पातून काही लाभ मुंबईला आपसूक मिळणार आहेत ते असे-
रेल्वे विस्तार : मुंबई प्रदेशात उपनगरीय रेल्वेचे नवे मार्ग उभारणे आणि आहे त्या मार्गाचा विस्तार करणे यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हाती घेतलेल्या प्रकल्पांना अर्थपुरवठा यापुढेही सुरू राहील. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) अंतर्गत लोकल मार्गांचे विस्तारीकरण व आधुनिकीरणासाठी 12000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे.
मुंबई मेट्रो : प्रकल्पाच्या 13 मार्गिका सध्या उभारल्या जात आहेत. या मेट्रो विस्तारासाठी अर्थसंकल्पीय मदत मिळेल.
बुलेट ट्रेन: देशात पहिली बुलेट ट्रेन मुंबई -अहमदाबाद धावणार असून त्यासाठी आर्थिक तरतूदही या अर्थसंकल्पाने केली. पुणे-मुंबई लिंकसह वेगवान रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची योजनाही या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. पुणे-मुंबई आणि पुणे-हैदराबाद या कॉरिडॉरसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 5 हजार कोटी रूपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
मुंबई-पुणे मेट्रो कॉरिडॉरसह या दोन शहरांच्या दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक सुधारण्यासाठी ग्रीन अर्बन मॉबिलिटी प्रोजेक्टमध्ये मोठी गुतवणूक करण्याची योजना.
मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 15 हजार शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये एव्हीजीसी कंटेंट क्रियेटर लॅब स्थापन केल्या जाणार आहेत.
महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना थेट फायदा मिळेल असे ‘शी-मार्ट’ ही दुकानांची साखळी उभारण्याचा मनोदय या अर्थसंकल्पाने व्यक्त केला आहे. खासकरून शहरी भागांसाठी ही योजना असल्याने मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि महामुंबई प्रदेशातील शहरांमध्येही ‘शी-मार्ट’ सुरू होऊ शकतात.
भुयारी प्रकल्प : मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टनेल बोरिंग मशिन स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ‘पाताळ लोक’ (जमिनीखाली भुयारांचे जाळे निर्माण करण्याचा प्रकल्प) या मुंबईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खर्च कमी होणार आहे.
मुंबई ः पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील लोकलगर्दीमुळे रोज दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच शीव स्टेशनजवळ तीन प्रवासी गर्दीमुळे लोकलमधून पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना असून रेल्वे प्रशासनाकडून मुंबई लोकल विस्ताराचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. रविवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पामुळे या विस्तारीकरणाला बळ मिळणार आहे.
मुंबई लोकल विस्तारांतर्गत (एमयूटीपी-3, 3 ए) सुमारे 400 किमीचे प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. गर्दी कमी करण्यासाठी 6 वी लाईन, नवीन स्थानके (बोरिवली-विरार) आणि 100 नवीन साध्या लोकल गाड्यांचे नियोजन सुरू आहे. बोरीवली-विरार 6वी लाईन 2028 पर्यंत आणि विरार-डहाणू तिसरी-चौथी लाईन डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पश्चिम रेल्वे बोरीवली-विरार 5 वी आणि 6वी लाईन प्रकल्प (एमयूटीपी 3 ए) प्रगतिपथावर आहे, जो 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे तसेच, वांद्रेपर्यंत 15-डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार सुरू आहे.
मध्य रेल्वे : बोरिवली-विरार 6व्या लाईनच्या कामाला हिरवा कंदील मिळाला असून, गर्दी कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.
हार्बर लाईन : गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत (एमयूटीपी 3 ए) हार्बर लाईन विस्तार प्रकल्पाचे काम सुरू आहे. नवीन लोकल : प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी 100 नवीन नॉन-एसी (साध्या) लोकल गाड्या आणण्याचे नियोजन आहे.
प्लॅटफॉर्म विस्तारः मुंबईतील चार प्रमुख टर्मिनसवर नवीन 20 प्लॅटफॉर्म बनवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या प्रकल्पांमुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्यांची संख्या वाढून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे. मेट्रोचे (4, 5, 6, 9, 10, 11, 12) या मार्गिका पुढील नियोजनात आहेत. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात अधिक कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 36 किलोमीटर, भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, उन्नत मार्ग 24.63 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके. घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकापर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर.