

मुंबई : विलीनीकरण करायचे की नाही करायचे, चर्चा करायची की नाही करायची, हा निर्णय राष्ट्रवादीचा असेल. आमची फक्त एवढीच अपेक्षा असेल की, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा निर्णय भाजपला अंधारात ठेवून घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
मीही अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय. मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहिती आहे, अजितदादा सगळ्या गोष्टी मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे, असा सूचक इशाराच यावेळी फडणवीस यांनी दिला. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून वादंग उठले आहे. शरद पवार गटाचे नेते 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाचा मुहूर्त ठरला होता, असा दावा करत आहेत. तसेच ही अजित पवारांचीच इच्छा होती आणि त्यासाठी अजित पवारांसोबत 12 ते 14 बैठका झाल्या होत्या, असा दावाही जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे आदी नेत्यांनी केला आहे. स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विलीनीकरण ठरल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री म्हणाले, अजित पवार हे अशा कुठल्याही प्रकारच्या एकत्रीकरणाची चर्चा करत होते; तर अशी कुठलीही चर्चा ते भाजपसोबत चर्चा केल्याशिवाय करतील का हा प्रश्न आहे. त्यामुळे जर त्यांनी विलीनीकरणाची चर्चा केली असेल तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केली असेल. जर त्यांनी तशी कोणतीच चर्चा केली नसेल तर मग भाग वेगळा. मी पुन्हा एकदा सांगतो की, चर्चा करायची की नाही कारायची, विलीनीकरण करायचे की नाही करायचे हा निर्णय राष्ट्रवादीचा असेल. आमची फक्त एवढीच अपेक्षा असेल की, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. महायुतीचा घटक पक्ष म्हणून ते आमच्याशी चर्चा करतात आणि यापुढेही करतील. काहीजण आपले हित न साधले गेल्याने संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला घाणेरडे राजकारण करायचे नाही. नाहीतर बर्याच गोष्टी मी सांगू शकतो, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष असून त्यांचे मंत्री, खासदार, आमदार निवडीचे सर्व निर्णय तेच घेत असतात. त्यात आमची कोणतीही भूमिका नाही. मित्रपक्ष म्हणून त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी राहण्याचे काम भाजप करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मी दोनच गोष्टी सांगेन, खरे म्हणजे ही बोलण्याची वेळ नाही. समजा, अजित पवार अशा पद्धतीच्या चर्चा करत होते, तर ते काय एनडीएममधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? सरकारमधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? ते तर सरकारमध्ये स्थिर होते. त्यामुळे उगीच काही तरी संभ्रम निर्माण करायचा आणि नंतर आपली ‘इको सिस्टीम’ वापरून तो संभ्रम ‘इको’ करायचा, ही पद्धत अयोग्य आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्हाला राजकारण करायचे नाही, नाही तर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय, मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहिती आहे, अजितदादा सगळ्या गोष्टी मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे, त्यांचा मृत्यू झाला, त्यापूर्वी जवळपास एक तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असे वाटते की, खालच्या स्तराचे राजकारण करणे हे योग्य नाही, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांना फटकारले.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरील टीका अयोग्य
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतला की नेतृत्व सुनेत्रा ताईंनी करावे. त्या निर्णयानुसार त्यांनी शपथ घेतली. हा निर्णय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. तो आमचा मित्र पक्ष असून त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही कालही पार पाडली, आजही पार पाडत आहोत आणि पुढेही पार पाडू. शपथविधी कधी करायचा, कसा करायचा, कोणता निर्णय घ्यायचा, या सगळ्या बाबी संबंधित पक्षच ठरवत असतो. परिस्थितीच्या गांभीर्यानुसार आणि त्या क्षणाच्या गरजेनुसार राजकीय पक्ष असे निर्णय घेत असतात. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही हा निर्णय घेतलेला आहे. मात्र त्यावर ज्या प्रकारे टीका केली जात आहे, ती अनावश्यक असल्याचेही फडणवीस म्हणाले.
आम्ही एनडीएसोबतच राहणार : सुनील तटकरे
आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही. कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष, दादांनी दिलेला विचार घेऊन पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका राहील आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
दादांची शपथ घेऊन सांगतो, चर्चा झाली होती : शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, अजित पवारांचे निधन झाले नसते तर ही चर्चा झाली की नाही हे सांगायची वेळ आली नसती. आमची बाजू अशी दाखवली जाते की, आम्हीच ही चर्चा सुरू केली आणि दादा गेले, त्यांच्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, माझे आणि त्यांचे भावनिक नाते आहे. त्यांची शपथ मी खोटी घेणार नाही. ही चर्चा शंभर टक्के झाली होती. दोन्ही पक्ष एकत्र यावेत ही दादांची इच्छा होती.