

मिलिंद कारेकर
मुंबई: लोकमान्य टिळक यांनी गिरगावच्या केशवजी नाईक चाळीत स्थापन केलेले पहिले गणेशोत्सव मंडळ यंदा १३४ वे वर्ष साजरे करत आहे. येथे साधेपणाने उत्सव साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सवाला वारली चित्रकलेचा साज देण्यात आला आहे.
या सजावटीमध्ये गणपतीच्या आगमनापासून नैवेद्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास वारली चित्रशैलीतून मांडण्यात आला आहे.
शेतकऱ्याची शेतीची तयारी, धान्य पेरणे, धान्य पिकवणे आणि त्यातून तयार होणाऱ्या अन्नधान्याचा प्रवास या सर्व गोष्टी चित्ररूपात दाखवण्यात आल्या आहेत. याच धान्यापासून उकड काढली जाते. त्या उकडीपासून गणपतीचा आवडता मोदक तयार होतो. शेवटी हा मोदक बाप्पाच्या चरणी नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
हा प्रवास सजावटीचा मध्यवर्ती भाव आहे. गणपतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या एकवीस पत्रींचाही या सजावटीत विशेष समावेश करण्यात आला आहे. चित्र कलाकार ओमकार वेजरे, समीर गार्डी, विनायक कावळे, अश्लेषा आसवले, चिन्मय राणे सुमित पाटील आणि शनि सोनवणे यांनी देखाव्यावर वारली कलेची चित्रे साकारली आहेत.
देखाव्यांवरील आकर्षक आणि सुबक वारली कलेची चित्रे साकारणारे पडघा येथील कलाकार शनि सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, १३८ वर्ष जुने असलेल्या केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सव मंडळासाठी काम करण्याची संधी डॉ. सुमित पाटील यांच्यामुळे मिळाली. याचा मनस्वी खूप आनंद होत आहे.
देखाव्यावरील वारली संस्कृतीची चित्रे काढण्यासाठी पाच-सहा दिवसांचा कालावधी लागला. केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सवाच्या मंदिरातील गाभाऱ्यावरील वारली चित्रे मी काढली आहेत. वारली कला फक्त ठाणे पालघरपुरती मर्यादित राहिलेली नसून संपूर्ण देशाने त्याचा स्वीकार केला आहे.
ही कला आदिवासींच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. अनेक ठिकाणी वारली कलेचे बाजारीकरण होताना दिसते. ते पाहिल्यावर वाईट वाटते. वारली संस्कृती जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचावी हा माझा प्रयत्न आहे.
देखावा साकारणारे कला दिग्दर्शक डॉ. सुमित संजय पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा नाही, तर आनंद, सामूहिक सहभाग आणि लोकपरंपरांचा उत्सव आहे.
त्यामुळे जास्वंदी आणि इतर फुलांचे हार तयार करणारे कारागीर, गणपतीच्या आगमनाच्या आनंदात नृत्य करणारे वारली आणि आदिवासी समाजातील लोक, पारंपरिक जीवनशैली आणि सामुदायिक उत्साह यांचे दर्शनही चित्रातून घडते.
केशवजी नाईक चाळीतील या मंडळाचे कार्यवाह कुमार वाळेकर यांनी सांगितले की, आमचा उत्सव पारंपारिक आहे. या सजावटीचा उद्देश देखावा निर्माण करणे नसून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने नव्या पिढीला महाराष्ट्राच्या प्राचीन लोककलेची, आदिवासी संस्कृतीची, शेतीपरंपरेची आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची ओळख करून देणे हा आहे.
तारपा वाद्यालाही विशेष स्थान
यंदाच्या वर्षी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना तारपा वाद्यासाठी मिळालेल्या सन्मानाची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे सजावटीमध्ये तारपा वाद्यालाही विशेष स्थान देण्यात आले आहे. हे वाद्य आदिवासी सांस्कृतिक परंपरेचे आणि सामूहिक उत्सव भावनेचे प्रतीक म्हणून मांडण्यात आले आहे.