

मुंबई: अमरनाथ यात्रेत बॉम्बस्फोटाचा मेसेज पाठविणार्या एका २६ वर्षांच्या डिलीव्हरी बॉयला समतानगर पोलिसांनी अटक केली. शुभम यादव असे तरुणाचे नाव असून गंमत म्हणून त्याने बॉम्बस्फोटाचा मेसेज पाठवल्याचे उघडकीस आले आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला जुलैमध्ये सुरुवात झाली होती. या यात्रेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काश्मीर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. १२ जुलैला एका अज्ञाताने काश्मीरच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन मोबाईलवर एक मेसेज पाठवला.
त्यात त्याने अमरनाथ यात्रेत बॉम्बस्फोट होणार असल्याचे नमूद केले होते. हा कॉल मुंबईतून आल्याचे उघडकीस आले होते, त्यामुळे ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली.यावर समतानगर पोलिसांनी तपास सुरू केला होता.
तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी कांदिवलीतील हनुमाननगर, नरसीपाडा, लक्ष्मी चाळीतील सुखशांती सोसायटीतील शुभम यादवला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची पाहणी केल्यानंतर त्यानेच १२ जुलैला हा मेसेज पाठविल्याचे उघडकीस आले.
शुभम हा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असून १२ जुलैला तो सोशल मिडीयावर काही रिल्स पाहत होता. यावेळी त्याला अमरनाथ यात्रेचा एक व्हिडीओ दिसला. त्यात एक व्यक्ती जॅकेट घातलेली होती. त्या रिलमध्ये काश्मीर पोलिसांच्या कंट्रोल रुमचा हेल्पलाईन क्रमांक होता. याच क्रमांकावर त्याने मेसेज पाठवला.