

मुंबई : दहशतवाद्यांसाठी बँकेत खाते उघडून कमिशन घेतल्याचा आरोप करुन एका वृद्धाला अटकेची भीती दाखवून सुमारे सव्वादोन कोटींची फसवणूक प्रकरणातील किशन भावेशभाई मकवाना या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो सायबर ठगांच्या संपर्कात राहून त्याने या ठगांसाठी बँकेत खाते उघडून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
77 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार गोरेगाव येथे राहत असून निवृत्त आहेत. नोव्हेंबर महिन्यात त्यांना आकाश वर्मा आणि प्रेमकुमार गौतम नावाच्या दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांचा कॉल आला. त्यांनी त्यांना त्यांच्या आधाकार्डवरुन जम्मू-काश्मीर येथील एका नामांकित बँकेत खाते उघडण्यात आले आहे. या खात्यात दहशतवाद्यांसाठी काही रक्कम जमा झाली होती. या रक्कमेतून त्यांना 70 लाखांचे कमिशन मिळाले होते असा आरोप करून तुमची चौकशी होणार असल्याचे सांगितले. त्यानतंर अटकेची भीती दाखविण्यात आली. विश्वास बसावा म्हणून त्यांना त्यांच्याविरुद्ध जारी केलेल वॉरंटसह नोटीस आणि कराराची प्रत पाठविण्यात आली. त्यात एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांची स्वाक्षरी होती.
त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्यासह इतर गुंतवणुकीची माहिती घेण्यात आली. दरम्यान, त्यांनी त्यांना काही बँक खात्याची माहिती पाठवून त्यांना बँकेतील रक्कम दिलेल्या खात्यावर पाठविण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी 18 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2025 या कालावधीत टप्याटप्याने सुमारे सव्वादोन कोटी रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर त्यांनी त्यांना त्यांचा जामिन झाला असून त्यांच्यावर आता अटकेची कारवाई होणार नाही. काही दिवसांत त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाईल असे सांगितले. मात्र त्यांनी ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित पोलिसांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे मोबाईल बंद येत होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी किशनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला आहे. त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँकेत खाते उघडून दिले होते. याच खात्याचा फसवणुकीसाठी वापर केला होता.
तक्रारदारासह इतर गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम आरोपीच्या बँक खात्यात जमा झाली असून त्याने ती साबर ठगांना ट्रान्स्फर केली आहे. तपासात आलेल्या या माहितीनंतर किशन मकवाना याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.यासह इतर गुन्ह्यांतही त्याचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता आहे.