

मुंबई : महेश पांचाळ
मुंबईतील सुपारीबाज गुंडांच्या गुन्हेगारीचा पॅटर्न बदलत असल्याचे अलीकडील काही प्रकरणांच्या तपासातून समोर आले आहे. पूर्वी अनुभवी आणि सराईत शूटरचा वापर केला जात होता. आता मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तुलनेने नवख्या तरुणांना हेरून त्यांच्याकडून हल्ले घडवून आणले जात असल्याचे तपासात आढळले आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहूतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासात मुख्य शूटर दीपक शर्माला हल्ल्यासाठी तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या कटासाठी आरोपींनी सिग्नल अॅपचा वापर झाला.
या प्रकरणातील काही आरोपी सोशल मीडियावरील पोस्ट आणि खात्यांमधून प्रभावित झाल्याचे तपासात समोर आले. एका आरोपीने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील पोस्ट पाहिल्यानंतर संबंधित गुन्हेगारी नेटवर्कशी संपर्क साधला. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यातील काही तरुणांची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी नोंद नव्हती. सोशल मीडियामुळे ते गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात आले. सराईत गुन्हेगारांच्या तुलनेत या नवख्या तरुणांना कमी पैशांत काम करून घेणे शक्य होत असल्याने त्यांचा वापर वाढत चालला आहे.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीने सुरुवातीला अनुभवी शूटरशी संपर्क साधला. मात्र त्याने मोठी रक्कम मागितल्यानंतर नवख्या शूटरचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यासाठी सुमारे १.५ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
एप्रिल २०२६ मध्ये मालाड पूर्व येथे जैन ट्रस्टचे ८२ वर्षीय पदाधिकारी वसंतजी अर्जुनभाई सुर्ती यांच्यावर हल्ला झाला. या प्रकरणात दिंडोशी पोलिसांनी श्रीनिवास सेल्वराज पल्लन (२७) आणि रणजीत पांडुरा अलेक्झांडर (४३) यांना अटक केली.
या प्रकरणांतून सुपारीच्या गुन्ह्यांची साखळी बदलत असल्याचे दिसून येते. सूत्रधार → मध्यस्थ → नवखा तरुण → प्रत्यक्ष हल्ला, अशी रचना तयार होत आहे. त्यामुळे केवळ हल्लेखोराला पकडून तपास पूर्ण होत नाही. त्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना मोबाईलचा तांत्रिक तपास, सोशल मीडिया खाती, आर्थिक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाइन संभाषणांचा आधार घ्यावा लागत आहे.
सराईत शूटरऐवजी नवख्या तरुणांचा वापर
सोशल मीडिया, मध्यस्थांमार्फत संपर्क
५० हजारांपासून लाखोंपर्यंत सुपारीचे व्यवहार
हे तरुण पूर्वीचे सराईत गुन्हेगार नसतात. सोशल मीडियावरून ते गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात येतात. काही जण स्वतःहूनही काम करण्याची इच्छा व्यक्त करतात. सराईत गुन्हेगारांच्या तुलनेत या नवख्या तरुणांना कमी पैसे देऊन काम करून घेतले जात असल्याचे तपासात आढळते.
मुंबई गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी