

पनवेल : विक्रम बाबर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देशांतर्गत हवाई जोडणीत आणखी एका महत्त्वाच्या विमान कंपनीची भर पडली आहे. गोवा मुख्यालय असलेल्या ‘फ्लाय ९१’च्या विमानाचे सोमवारी नवी मुंबई विमानतळावर प्रथमच आगमन झाले. हैदराबादहून आलेल्या या विमानाचे पारंपरिक जलतोफेच्या सलामीने स्वागत करण्यात आले. ‘फ्लाय ९१’च्या आगमनामुळे नवी मुंबई विमानतळाच्या वाढत्या हवाई जाळ्याला आणखी बळ मिळाले आहे.
‘फ्लाय ९१’च्या हिवाळी वेळापत्रकानुसार नवी मुंबईहून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या चार ठिकाणी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि लक्षद्वीपमधील पर्यटन, व्यवसाय तसेच प्रादेशिक प्रवासासाठी प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. नवी मुंबई हे ‘फ्लाय ९१’चे १४वे देशांतर्गत आणि महाराष्ट्रातील पाचवे गंतव्यस्थान ठरले आहे.
कंपनीच्या हवाई जाळ्यात गोवा, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, अगत्ती, कोची, हुबळी, राजमुंद्री, विजयवाडा आणि तिरुपती या ठिकाणांचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य विमानतळ अधिकारी सुभाष मुरिकेनचेरी म्हणाले, फ्लाय ९१ चे नवी आगमन महत्त्वाची भर आहे.
४० विमानांची मोठी ऑर्डर
‘फ्लाय ९१’ने भविष्यातील विस्ताराची तयारीही सुरू केली आहे. कंपनीने सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर किमतीच्या ४० एटीआर-७२-६०० विमानांची निश्चित ऑर्डर दिली आहे. या विमानांची पूर्तता २०२७ ते २०३२ या कालावधीत होणार आहे. त्यामुळे कंपनीचा ताफा सध्याच्या सहा विमानांवरून ६० विमानांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.
३२ लाखांहून अधिक प्रवाशांचा टप्पा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यापासून ३२ लाखांहून अधिक प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानतळावरील प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. विमानतळाची सुरुवात १३ गंतव्यस्थानांच्या जोडणीने झाली होती. आता नवी मुंबई विमानतळावरून सुमारे ४३ देशांतर्गत गंतव्यस्थानांना जोडणी उपलब्ध झाली असून, आतापर्यंत २५ हजार २९५ हून अधिक व्यावसायिक विमानफेऱ्या झाल्या आहेत. वाढते हवाई जाळे आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद यामुळे नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासह पश्चिम भारतातील महत्त्वाचे विमान वाहतूक केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे.