

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचाराने जोर पकडला आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडविला असून उमेदवारांनी वॉर्डात पायपीट सुरू केली आहे. मात्र, अनेक मतदारसंघात घाऊक प्रमाणात अपक्ष उमेदवार उभे आहेत. या अपक्षांमुळे होणाऱ्या संभाव्य मतविभाजनाचा फटका टाळण्यासाठी प्रमुख उमेदवारांची मोर्चेबांधणी चालू केली आहे. मुंबईतील 227 पैकी 52 जागांवर दहा किंवा त्याहून अधिक उमेदवार आहेत.
उत्तर मुंबईत सहा जागांवर सहापेक्षा अधिक उमेदवार असून 11 वॉर्डात पाच ते नऊ उमेदवारांमध्ये लढत आहेत. तर, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रात आठ वॉर्डात दहापेक्षा जास्त उमेदवार आहेत. तर, तब्बल वीस जागांवरील उमेदवारांची संख्या पाच ते नऊ आहे. तर, उत्तर मध्य मुंबईत सर्वात कमी म्हणजे तीन जागांवर दहा किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार आहेत. तर, 22 ठिकाणी पाचपेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उत्तर पूर्व मुंबईत सर्वाधिक 22 जागांवर पाचपेक्षा अधिक उमेदवार असून दहा ठिकाणी दहापेक्षा अधिक उमेदवार आहेत.
दहापेक्षा अधिक उमेदवारांची सर्वाधिक संख्या ही दक्षिण मध्य मुंबईत असून इथे 18 वॉर्डात बहुरंगी लढती आहेत. याच क्षेत्रात वीस जागांवर उमेदवारांच्या संख्येने दहाचा आकडा पार केला आहे. दक्षिण मुंबईतील सात वॉर्डातील उमेदवारांच्या संख्येने दहाचा आकडा पार केला आहे. तर, 16 जागांवर पाच ते नऊ उमेदवार रिंगणात आहेत.