

मुंबई: ईडीची कारवाई, झडती आणि अटकेची भीती दाखवून मुंबईतील व्यावसायिकाकडून २ कोटी २५ लाख रुपये उकळल्याचा आरोप जयपूर येथे कार्यरत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) दोन अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोरेगाव येथील बांगूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. संबंधित दोन्ही व्यक्ती ईडीचे अधिकारी असल्याची प्राथमिक चौकशीत खात्री झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘विंट्री टेक प्रायव्हेट लिमिटेड’चे मालक अमूल्य वस्सा यांनी याबाबत तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, २० जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास जयपूर ईडीचे सहाय्यक संचालक मोहित गर्ग (३६) आणि अंमलबजावणी अधिकारी देवेंद्र गुप्ता (३५) मालाड पश्चिम येथील माईंडस्पेसमधील केन प्लाझा येथील त्यांच्या कार्यालयात आले.
दोघांनी कंपनीच्या व्यवसायाबाबत चौकशी केली. वस्सा यांचा गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांच्या व्यवहाराशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे न दाखवता कार्यालयावर झडती व जप्तीची कारवाई करण्याची तसेच अटकेची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. वस्सा यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याची भीतीही दाखवण्यात आली.
तसेच दोन महागडे मोबाइल आणि सिमकार्ड तयार ठेवण्यास सांगण्यात आले. त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या नावावरील मोबाइल आणि सिमकार्ड घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पाच कोटींची मागणी; २.२५ कोटींवर तडजोड
तक्रारीनुसार, सुरुवातीला पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. रक्कम न दिल्यास कठोर कारवाई आणि अटक होऊ शकते, अशी भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर २.२५ कोटी रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वस्सा यांनी एक कोटी रुपये दिले.
उर्वरित रक्कम देण्यासाठी वस्सा यांच्या दोन सहकाऱ्यांची २५ जुलै रोजी दिल्लीतील एका मॉलमध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी भेट झाली. त्या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण बंद करण्यास मंजुरी दिल्याचे दर्शविणारे कागदपत्र दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर १ कोटी २५ लाख रुपये देण्यात आले.
दरमहा पैसे देण्याचीही मागणी
२.२५ कोटी रुपये दिल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी आणखी पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ अधिकारी नाराज असल्याचे सांगून अतिरिक्त रक्कम तसेच दरमहा नियमित पैसे देण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर वस्सा यांनी त्यांना देण्यात आलेल्या कागदपत्रांची चौकशी केली.
त्यातून आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. प्राथमिक चौकशीत तक्रारीत नमूद केलेले मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता हे खरोखरच जयपूर येथे कार्यरत ईडीचे अधिकारी असल्याचे समोर आले. त्यानंतर बांगूरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.