

Nishikant Dubey Thackeray Brothers BMC Election: मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असतानाच, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरून ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिलं आहे. “आता मुंबईत येऊन भेटतो…” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
निशिकांत दुबे यांनी ‘X’ (ट्विटर)वर पोस्ट करत भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की लवकरच ते मुंबईत येतील आणि उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची भेट घेतील. त्यांच्या या विधानाकडे अनेकजण उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांना दिलेलं प्रत्युत्तर म्हणून पाहत आहेत. कारण मागच्या काही महिन्यांपासून मुंबईत भाषा आणि मराठी अस्मिता यावरून राजकारण तापलं होतं.
दरम्यान, निवडणूक ट्रेंडनुसार महायुती 115 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. बहुमतासाठी लागणारा आकडा 114 असल्याने महायुती बहुमताच्या पुढे गेलेली दिसते. दुसरीकडे, ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित ताकद जवळपास 68 जागांपर्यंत मर्यादित असल्याची माहिती आहे. काँग्रेसलाही साधारण 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी भाजपची लाट रोखता आली नाही, असा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचा मराठी मुद्दा आणि युतीचा प्रयोग फारसा प्रभावी ठरला नाही, असा निष्कर्ष काही जण काढत आहेत.
या सगळ्या वादामागे मागच्या वर्षीचा एक प्रसंगही आहे. जुलै महिन्यात निशिकांत दुबे यांनी मनसेकडून एका अमराठी दुकानदाराला मारहाण झाली होती. त्यावेळी त्यांनी “यूपी-बिहारमध्ये आलात तर तुम्हाला आपटून मारु,” असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर मोठा गदारोळ झाला होता.
आता मुंबई महापालिकेत भाजप आघाडीवर असतानाच निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा “मुंबईत येतो” असं म्हणत अप्रत्यक्षरित्या ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यामुळे हा विषय केवळ निवडणुकीपुरता न राहता, भाषा आणि अस्मितेचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.