

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणार आहे. त्यामुळे साहजिकच मुंबईवर सत्ता बनवण्यासाठी भाजपासह शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) नेते धडपडत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये मुंबई महापालिका निवडणूकीसाठी बिघाडी झाली आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच आता भाजपला रोखण्यासाठी शरद पवार यांनी दोन्ही ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबईत काँग्रेसने 'एकला चलो'चा नारा दिल्याने काँग्रेसला सोबत न घेताच पवार आणि ठाकरे इतर विरोधी पक्षाची मोट बांधण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत महत्त्वपूर्ण फोनवरून चर्चा झाली आहे.