

मुंबई ः मृणालिनी नानिवडेकर
सर्वोच्च न्यायालयातील घडामोडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार असताना राजकीय पक्षांनी मात्र निवडणुका होणार हे गृहीत धरीत जोरदार तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्रातील 310 नगरपरिषदा आणि नगरपालिकांत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले आहेत. आता आपल्या नगरातही भाजपचा नगराध्यक्ष असे तिहेरी सरकार आल्यास विकासाला चालना मिळेल अशी पक्षाने प्रचाराची रणनीती ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारातला हुकमी एक्का आहेत. त्यांचे येत्या दहा दिवसांत किमान 30 सभा घेण्याचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. राज्यातील साडेतीनशेहून अधिक ठिकाणी फडणवीस यांच्या सभा व्हाव्यात अशी मागणी पुढे आली आहे.
भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे यांनी प्रचाराची समन्वय धुरा हाती घेतली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याही सभा होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभांनाही प्रचंड मोठी मागणी असून ते प्रचारासाठी वेळ देणार आहेत.
गाव पातळीवर तसेच नगर पातळीवर विकासाचे प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्ष देणार आहे. प्रत्येक नगरपालिका आणि नगरपरिषदेत स्व तंत्र जाहीरनामा प्रकाशित केला जाणार असून या जाहीरनाम्यातील तपशील निवडणूक व्यवस्थापन समितीने निश्चित केला आहे.
माधवी नाईक याही समन्वयाची जबाबदारी बघत असून, जाहीरनामा ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी तयार केला आहे. यासंदर्भात मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या बैठकांना पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी शिवप्रसाद सिंह जातीने हजर होते.
ठाकरे बंधूंत जागावाटपाची चर्चा!
मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने मोठ्या भावाप्रमाणे मनसेला कोणत्या वॉर्डात लढायची इच्छा आहे आणि त्या मागचे कारण काय हे प्रारंभी सांगावे, त्यानुसार आपण चर्चा करू असा प्रस्ताव ठेवला. मनसेला ही भूमिका मान्य आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर मुंबईचा अभ्यास करून कोणत्या जागा महत्त्वाच्या आणि मनसेचा उमेदवार कुठे जिंकून येऊ शकेल याची यादी येत्या दोन ते तीन दिवसांत शिवसेना उबाठाला सादर करेल. उद्धव ठाकरे यांचे निकटचे शिलेदार खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि अनिल परब हे या जागा वाटपाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यास संदर्भ बदलतील, असे दोन्ही पक्षांनी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिका या सर्वात महत्त्वाच्या निवडणूक महासंग्रामासाठी आता दोन्ही ठाकरे बंधूंनी कंबर कसली असून, प्रारंभिक चर्चेसाठी एकत्र भेटून मनसेने बरोबरीच्या वॉर्ड संख्यांपेक्षा आम्ही जिंकू शकू अशा ठिकाणी आम्हाला संधी द्या अशी भूमिका घेतल्याचे समजते.