

मुंबई : मुंबईत सर्वच राजकीय पक्षांमध्ये मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढवण्यासाठी किमान 3 ते 4 इच्छुक आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या सरासरी 3 हजारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय पेच प्रसंगात उमेदवारीवरून निर्माण होणारा तिढा सोडवणार कसा, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.
मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणार आहे. त्यामुळे साहजिकच मुंबईचा नगरसेवक बनण्यासाठी भाजपासह शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व समाजवादी पार्टीचे पदाधिकारी इच्छुक आहेत. त्यामुळे सध्या मुंबईतील 227 प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील माजी नगरसेवकांसह सर्वच पक्षाचे त्या त्या प्रभागातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी आपापल्या नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी यासाठी काही नेत्यांनीही पक्षप्रमुखांकडे फील्डिंग लावली आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न पक्षाच्या प्रमुखांना पडला आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची नाराजी ओढवून घेणे कोणत्याच पक्षाला राजकीयदृष्ट्या फायदेशीर नाही. आता दुसरीकडे एकापेक्षा जास्त इच्छुकाना उमेदवारीही देणे शक्य नाही. त्यामुळे हा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्न नेत्यांना पडला आहे.
शिवसेना, भाजपा, ठाकरे गट व मनसेचे काही इच्छुक आपल्याला उमेदवारी मिळणार असे जाहीरपणे सांगत असून तशी जाहिरातबाजी सुरू केली आहे. एवढेच काय तर वरिष्ठांनी आपल्याला कामाला लागा असे ग्रीन सिग्नल दिल्याचेही काही माजी नगरसेवक सांगत आहेत. त्यामुळे 227 प्रभागांतील सर्वच इच्छुक आपल्यालाच उमेदवारी मिळणार म्हणून कामाला लागले आहेत. त्यामुळे सध्या प्रभागांमध्ये सर्वच पक्षांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी माजली आहे. त्यामुळे कार्यकर्ताही अडचणीत सापडला असून नेमका पाठिंबा द्यायचा कोणाला, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
आम्हाला अंतर्गत राजकारण नको, पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याचे आम्ही काम करू असे कार्यकर्ते सांगत आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी आपल्याच इच्छुक उमेदवाराला उमेदवारी देण्यासाठी मागणी केली आहे.
काही माजी नगरसेवकांचे पत्ते कापले जाण्याची शक्यता
मुंबई शहर व उपनगरातील 227 पैकी काही नगरसेवकांचे पत्ते कापण्याची शक्यता आहे. भाजपासह शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे नेमका कोणत्या माजी नगरसेवकाचा पत्ता कट होणार, याचे सर्वच पक्षातील माजी नगरसेवकांना टेन्शन आले आहे.
इच्छुकांची समजूत काढणार
महापालिका निवडणुक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक असून प्रत्येकाला उमेदवारी देणे शक्य नाही. त्यामुळे इच्छुकांशी संवाद साधून त्यांची समजूत काढण्यात येणार असल्याचे राजकीय पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता आणायची असेल तर अंतर्गत वाद बाजूला ठेवा, अशी विनवणीही करण्यात येणार असल्याचे समजते.