

प्रकाश साबळे
मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होऊन जानेवारी २०२६मध्ये झाल्या. परंतु प्रभाग समित्यांवरील बिनसरकारी संघटना, संस्था आणि समाजलक्षी संघटना ह्यांच्या प्रतिनिधीच्या (एन.जी.ओ) नियुक्त्या रखडलेल्या आहेत.
महापालिकेच्या सचिव विभागाने अधिसूचना प्रसिद्ध करून तीन महिने उलटली आहेत. मात्र निवड करण्यास महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना मुहूर्त मिळत नसल्यामुळे अर्ज केलेल्या सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
महानगरपालिकेच्या १७ प्रभाग समित्यांवर स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशनच्या (सीबीओ) प्रतिनिधींच्या नियुक्तीसासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जून २०२६ रोजी संपल्यानंतरही छाननी, प्राथमिक यादी, हरकती-सूचना आणि अंतिम नियुक्त्यांबाबत महापालिकेकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याने या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ५० टीटी अंतर्गत ९ मे रोजी एनजीओ/सीबीओ प्रतिनिधींसाठी अर्ज मागविण्यात आले होते. ३० मे रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनंतर अर्जाची मुदत १५ जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानंतर ती पुन्हा २२ जूनपर्यंत करण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतर प्रक्रिया पुढे नेण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस घोषणा झालेली नसल्याचा दावा अर्जदारांकडून करण्यात आला आहे.
महापालिकेच्या एम.पुर्व विभागात तब्बल २८ अर्ज दाखल झाले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेल्या अधिकृत यादीत ॲड. फैयाज आलम किताबुल्लाह शेख यांचे नाव १९ व्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे, एनजीओ प्रतिनिधींच्या नियुक्त्या प्रलंबित असतानाही प्रभाग समित्यांच्या बैठका सुरू असल्याने, नागरिकांच्या प्रतिनिधित्वाचा उद्देशच बाजूला पडत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
या प्रकरणी ॲड. शेख यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह महानगरपालिका सचिव, राज्य निवडणूक आयोग आणि नगरविकास विभागाकडे तक्रार केली आहे.
सचिव विभागाने हात झटकले
महानगरपालिकेच्या सचिव विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, सदर निवड प्रक्रियाशी सचिव विभागाचा कुठलाही संबंध नाही. विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांचे आलेल्या अर्जातून छननी करतात. तो आमचा विषय नसल्याचे सांगत सचिव विभागातील अधिकाऱ्यांनी हात झटकले.
काही तांत्रिक कारणामुळे नियुक्त्यां रखडलेल्या आहेत. तसेच नियमांनुसार अर्ज आलेली नाहीत. यासाठी पुन्हा प्रक्रिया घेवून लवकरात लवकर नियुक्त्या जाहीर करु.
-गणेश खणकर, सभागृह नेता, मुंबई महापालिका