

मुंबई: भक्तांनी यथाशक्ती मनोभावे केलेली पूजा स्वीकारून शनिवारी गणपती बाप्पा व गौरी आपल्या भक्तांचा शनिवारी निरोप घेणार आहेत. यासाठी महापालिकेने नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळी सर्व तयारी पूर्ण केली असून विसर्जन स्थळी कर्मचारी व अधिकारी तैनात राहणार आहेत. अग्निशमन दल, रुग्णवाहिका ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहेत.
घरगुती व काही सार्वजनिक गणपती व गौरींचे मोठ्या प्रमाणात मुंबई शहर व उपनगरात विसर्जन होत असल्यामुळे पालिकेने सर्वच विसर्जन स्थळे सुसज्ज ठेवली आहेत.
मुंबई महापालिकेने गिरगाव चौपाटी, दादर, जुहू, सात बंगला वेसावे, गोराई, मढ, मार्वे आदी चौपट्यांसह पवई तलाव व अन्य कृत्रिम विसर्जन स्थळांसह कृत्रिम तलाव शहराच्या विविध भागात सज्ज ठेवण्यात आली आहेत.
यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कृत्रिम तलावांमध्ये गंगाजल, गुलाबाच्या पाकळ्या टाकून पावित्र्य राखण्यात आले असून विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना तुळशीचे रोपटे व वाळू देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येणार आहे.
६० ते ६५ हजार गणेश मूर्तिचे तर पाच हजारांहून अधिक गौरींच्या विसर्जनाची शक्यता
नैसर्गिक व कृत्रिम तलावाजवळ होणारी गर्दी लक्षात घेऊन, पालिकेने यंदा प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत फिरती विसर्जन स्थळे ही ठेवली आहेत. त्यामुळे या विसर्जन स्थळातही बाप्पाचे नैसर्गिक तलावाप्रमाणे विसर्जन करता येणार आहे.
गौरी- गणपतींचे विसर्जन एकत्र होणारा असल्यामुळे यंदा ६० ते ६५ हजारापेक्षा जास्त घरगुती व सार्वजनिक गणपतीचे तर सुमारे ५ हजारांहून जास्त गौरींचे विसर्जन होण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवली जात आहे. यासाठी शनिवारी सकाळपासून मध्यरात्री उशिरापर्यंत विसर्जन स्थळी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले.
पुरविण्यात येणाऱ्या सुविधा
पालिकेच्या २६ प्रशासकीय विभाग कार्यालय परिसरात नियंत्रण कक्ष
प्रमुख विसर्जन स्थळी ३५० पेक्षा जास्त जीव रक्षक तैनात.
नैसर्गिक विसर्जन स्थळी मोटार बोट व जर्मन तराफा
समन्वयासाठी प्रमुख विसर्जन स्थळी स्वागत कक्ष
प्रकाश व्यवस्थेसाठी फ्लड लाईट व सर्च लाईट
महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका
विसर्जन स्थळी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था
पाच दिवसांचे बाप्पा गेले गावाला
‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’च्या जयघोषात मुंबईकरांनी शुक्रवारी पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. गिरगाव, जुहू, दादर, वरळी आदी समुद्रकिनाऱ्यांसह शहरातील कृत्रिम तलावांवर सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती.
नैसर्गिक विसर्जनस्थळांच्या तुलनेत कृत्रिम तलावांकडे घरगुती गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्तांचा कल दिसून आला. शहरातील ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळे व ३८३ कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत २,०३३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते.