

मुंबई: मुंबईला यंदाही साथीच्या आजारांचा विळखा पडला असून, मलेरिया आणि स्वाईनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते १५ सप्टेंबरदरम्यान मलेरियाचे तब्बल ८ हजार ७२३ रुग्ण आढळले.
गेल्या वर्षी याच कालावधीत ६ हजार २७७ रुग्णांची नोंद झाली होती. स्वाईनचे रुग्ण संख्या ८३ वरून ५०७ वर पोहोचली आहे.दुसरीकडे डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि कोविड-१९च्या रुग्णसंख्येत मात्र घट झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, यंदा १५ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे २ हजार ६५६ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच कालावधीत २ हजार ७२४ रुग्ण होते. चिकुनगुनियाचे रुग्ण ५४२ वरून ८०, लेप्टोस्पायरोसिसचे ५५८ वरून ३९०, गॅस्ट्रोचे ५ हजार ९८९ वरून ४ हजार ९९७, तर कोविड-१९चे रुग्ण १ हजार ११८ वरून १७८ झाले आहेत.
१ ते १५ सप्टेंबरदरम्यान पालिकेने ५ लाख ९४ हजार २६९ घरांचे सर्वेक्षण केले. या मोहिमेत २७ लाख ९३ हजार १९३ नागरिकांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली तरी साथींचे आजार जोरात आहेत.
डासांची उत्पत्तीस्थळे शोधण्यावर भर
विहिरी, पाण्याच्या टाक्या आदी २१ हजार ६५५ संभाव्य उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ३६७ ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळली. पाण्याची पिंपे, टायर, भंगार वस्तू, पेट्री प्लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट आदी ४ लाख ६८ हजार ९९३ संभाव्य उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली.
ऑगस्टमध्ये मलेरियाची उसळी
मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव ऑगस्टच्या आकडेवारीतही दिसून येतो. जून-जुलैमध्ये मलेरियाचे २ हजार ०३५ रुग्ण होते.
ऑगस्टमध्ये ही संख्या २ हजार ४५० वर पोहोचली. म्हणजेच एका महिन्यात मलेरियाच्या रुग्णांत ४१५ ने वाढ झाली.
एच१एन१चे रुग्णही जून-जुलैतील १६३ वरून ऑगस्टमध्ये २७८ झाले. डेंग्यूचे रुग्ण ७३२ वरून ८३१, चिकुनगुनिया १४ वरून ३२ आणि लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण १११ वरून १४४ झाले.