

नवी मुंबई : राजेंद्र पाटील
दिवाळीच्या तोंडावर मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड आणि किसमिसच्या दरांनी मोठी उसळी घेतली असून सर्वच प्रकारच्या सुकामेव्यांचे दर किलोमागे २०० ते ६०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. दरवाढीचे हे प्रमाण ३५ ते ४० टक्के आहे. असे असले तरी यंदाच्या दिवाळीत एपीएमसीमध्ये दहा ते अकरा हजार टन सुकामेवा विक्री होईल आणि उलाढाल ६०० ते ६५० कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज मुंबई एपीएमसीतील घाऊक सुकामेवा व्यापारी मनीभाई वाग्ड यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केला.
एपीएमसीतील सुकामेवा महागाईचे परिणाम किरकोळ बाजारातही उमटले आहेत. किरकोळ बाजारात सुकामेव्याच्या दरात यंदा २५ ते ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ममरा बदामच्या दरात तर शंभर टक्के म्हणजे दुप्पट वाढ झाली आहे. काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड आणि किसमिसच्या दरात वाढ झाली असून यामुळे दिवाळीचा फराळ आणि ड्राय फ्रूट्स गिफ्ट पॅक महागण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ, आयातीमधील तुटवडा आणि वाढलेला वाहतूक खर्च या कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दिवाळीच्या सणात मागणी आणखी वाढल्याने दरांवर अधिक दबाव येऊन सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दिवाळीत भेट देण्यास मिक्स ड्रायफ्रूट्स बॉक्सला प्राधान्य देण्यात आल्याचे यंदा दिसतेे. आता सणासुदीत गोड मिठाईच्या मागणीत घट झाली असून ग्राहकांनी सुकामेव्याला पसंती दिली आहे. विशेषतः दिवाळीत सुकामेव्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने एक महिन्यापासून सुकामेव्याची आवकही वाढली आहे.
गेल्या वर्षी मुंबई एपीएमसीमध्ये दिवाळीत सुमारे ९ हजार टन सुकामेव्याची विक्री होऊन साडेपाचशे कोटींची उलाढाल झाली होती. यंदा ती सहाशे ते साडेसहाशे कोटींपर्यंत जाऊ शकते.
सुकामेव्याचे नवे दर (प्रतिकिलो)
पिस्ता (खारा) - १,१०० ते २,१००
हिरवा पिस्ता - ३,००० ते ३,२००
बदाम -१,००० ते १,५००
काजू - ९५० ते १,५००
अंजीर -१,००० ते २,०००
अक्रोड - ९०० ते २,२००
खजूर -६५० ते २,०००
साधी किसमिस - ४८० ते ६००
अफगाणी किसमिस -८०० ते १,६००
काळी किसमिस -५२० ते १,२००
उत्तम एक नंबर प्रतवारीचे
प्रीमियम ममरा बदाम - ५,४०० प्रति किलो
पाईन नट्स (चिलगोजा) - ६,००० प्रति किलो