

मुंबई : विदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची कॅबचालकाकडून फसवणूक होण्याची मालिका सुरूच आहे. साडे पाचशे रुपये भाडे असताना एका थाई जोडप्याला 3 हजारांना गंडा घालणाऱ्या इम्तियाज अहमद आणि रियासत अली खान या दोन कॅबचालकांना सहार पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून या दोघांनी अनेक प्रवाशांना गंडा घातल्याचे बोलले जाते. यातील तक्रारदार थाईलंडचे रहिवाशी असून रविवारी 8 फेब्रुवारीला ते त्यांच्या पत्नीसोबत मुंबईत आले होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर त्यांनी कॅब सेवेबाबत विचारणा केली होती. यावेळी एका कॅबचालकाने त्यांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन वडाळा येथे घेऊन जाण्यासाठी एक हजार थाई बात भाडे आकारले होते. साडेपाचशे रुपये भाडे होत असताना त्यांच्याकडून त्याने तीन हजार तीनशे रुपयांचे भाडे आकारले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी कॅबचालकाविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी इम्तियात अहमद आणि रियासत अली खान या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
या दोघांचा परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांनी आरटीओकडे पत्रव्यवहार केला आहे. यापूर्वीही आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही कॅब आणि टॅक्सीचालकांकडून विदेशी नागरिकांची फसवणूक झाली होती. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत अशा कॅब आणि टॅक्सीचालकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे.