

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक जिल्ह्यात शिंदे गटाची कामगिरी अपेक्षित झाली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या मंत्र्यांवर जिल्ह्याची जबाबदारी दिली होती त्यांच्यावर शिंदे नाराज आहेत. त्यामुळे असमाधानकारक कामगिरी झालेल्या ठिकाणच्या मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे.
राज्यातील महापालिका , नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदे यांनी मंत्र्यांवर जबाबदारी दिली होती. स्वतः शिंदे यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर , कल्याण डोंबिवली आदीची जबाबदारी घेतली होती. त्या महापालिकात त्यांच्या गटाला चांगले यश मिळाले. मोठे आव्हान असताना ही या महापालिकांमध्ये सत्ता आली. मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये शिंदे गटाला यश मिळाले नाही. उमेदवार निवडीपासून सर्वाधिकार मंत्र्यांना दिलेले काही मंत्र्यांची कामगिरी कुचकामी झाली आहे. त्यांना आगामी मंत्रिमंडळ बदलात बदलण्यात येईल, असे कळते.
शिंदे गटाचे 57 आमदार असून केवळ 10 मंत्री आहेत. त्यामुळे भाकरी पलटी करण्यात येणार आहे. मंत्री बनविताना त्यांना तसे बजावण्यात आले होते. मंत्र्यांना आपल्या कामांचे अहवाल सादर करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. त्या अहवालानंतर मंत्र्यांना बदलाबाबत निर्णय होणार आहे