Fake Indian Passport: खोटी ओळख अन् बनावट भारतीय पासपोर्ट; मुंबई विमानतळावर सहा अफगाण नागरिक अटकेत

बनावट ओळख व कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याच्या आरोपावरून मुंबई विमानतळावर ६ अफगाण नागरिकांना अटक.
Indian Passport
Indian PassportFile Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: खोटी ओळख आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून त्याचा वापर करून परदेशवारी करणाऱ्या सहा अफगाण नागरिकांना मुंबई विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली आहे.

१ ऑगस्ट ते २२ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या कारवायांमध्ये पोलिसांनी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

संबंधित नागरिकांनी अफगाणिस्तानातून पर्यटक किंवा वैद्यकीय व्हिसावर भारतात प्रवेश केला होता. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य करून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळख निर्माण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, नियाज खान (४१) याने २०१५ मध्ये ठाण्यात आणि २०२५ मध्ये मुंबईत खोटे जन्मस्थळ दाखवून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून बनावट मतदार ओळखपत्रासह अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली.

Indian Passport
Central Railway Special Trains: दसरा-दिवाळीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईहून ४१८ विशेष गाड्या

गुल शिरुल्ला याला ७ ऑगस्ट रोजी दुबईला जाण्याच्या प्रयत्नात अडवण्यात आले. त्यानेही खोटे जन्मस्थळ दाखवून २०२५ मध्ये पासपोर्ट मिळवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. चौकशीदरम्यान त्याने मोबाइलमधील माहिती हटविल्याचे आढळले.

हमदुल्ला हाजी लाहोर (३७) याने २०२२ मध्ये ‘खलिजन शेख’ या नावाने भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे. या पासपोर्टचा वापर करून त्याने अफगाणिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीचा प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, शेरबत खान आणि सुजान खान यांना १७ सप्टेंबर रोजी दुबईहून मुंबईत परतल्यानंतर पकडण्यात आले. दोघांनीही खोटे जन्मस्थळ दाखवून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे.

अमजद खान (४०) याला २१ सप्टेंबर रोजी दुबईला जाण्याच्या प्रयत्नात ताब्यात घेण्यात आले. तो २०१५ मध्ये ‘मोहम्मद खालिद’ या नावाने भारतात दाखल झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्याने २०१८ मध्ये खोटी माहिती देऊन भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप असून त्याच्याकडून बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

Indian Passport
Mumbai Airport Gold Smuggling: दूध पावडर, ओट्सच्या पाकिटांत लपवले १४.८१ कोटींचे सोने; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

एजंटाचा शोध सुरू

  • या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा धागा म्हणजे बनावट भारतीय ओळखपत्रे आणि पासपोर्ट मिळवून देणारा एजंट कोण? याचा सहार पोलिस तपास करीत आहेत.

  • यापूर्वीही मुंबईत परदेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटांविरोधात कारवाई झाली आहे.

  • मार्च २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सहार पोलिसांनी अशा प्रकरणांत २० एजंटांना अटक केल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news