

महेश पांचाळ
मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून सोने आणून भारतात उतरवणे आणि हिरे परदेशात पाठवणे, अशा दुहेरी तस्करीचे रॅकेट महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उघडकीस आणले आहे.
विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात होते. डीआरआयने कारवाईत ८.५६४ किलो विदेशी सोने आणि १,१६८.९७ कॅरेट हिरे, असा सुमारे १३.७३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
डीआरआयला विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या दुकानात काम करणारा सकीब अन्सारी (२७) तस्करीत सहभागी असल्याची माहिती मिळाली होती. एका भारतीय प्रवाशाकडून हिऱ्यांची खेप घेण्यासाठी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
अन्सारीची झडती घेतली असता मेणामध्ये लपविलेल्या सोन्याच्या धुळीच्या तीन कॅप्सूल सापडल्या. चौकशीत आणखी प्रवासी त्याच्याकडे सोने देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर डीआरआयने विमानतळावर पाळत ठेवली.
बांगलादेशातील चार आणि श्रीलंकेतील दोन प्रवासी सोन्याच्या कॅप्सूल घेऊन आल्याचे समोर आले. या कॅप्सूल शरीरात लपवून त्या मुंबईत आणल्या जात होत्या. विमानतळावर आल्यानंतर त्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे दिल्या जात होत्या.
२३ कॅप्सूलमध्ये ८.५६४ किलो सोने
कारवाईत २३ सोन्याच्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये २४ कॅरेट विदेशी सोन्याची पावडर होती. तिचे वजन ८.५६४ किलो असून किंमत १२.६४ कोटी रुपये आहे.
हिरे दुबईला पाठवण्याचा प्रयत्न
तस्करीच्या रॅकेटचा दुसरा भाग हिऱ्यांशी संबंधित होता. विमानतळावरील कर्मचाऱ्याच्या माध्यमातून एका भारतीय प्रवाशाला हिरे देण्यात आले. हा प्रवासी दुबईला जाणार होता. डीआरआयने त्याच्याकडून १,१६८.९७ कॅरेट हिरे जप्त केले.
यामध्ये १३२.१७ कॅरेट नैसर्गिक व १,०३६.८० कॅरेट प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे आहेत. त्यांची किंमत १.०९ कोटी रुपये आहे. या प्रकरणात एक कंत्राटी कर्मचारी, सहा आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट प्रवासी आणि एक भारतीय प्रवासी, अशा आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
तस्करीचा नवा फॉर्म्युला
मुंबई विमानतळावर तस्करीचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. परदेशातून यायचे, शरीरात सोन्याच्या कॅप्सूल लपवायच्या, मुंबईत विमानतळातील ‘इनसाइडर’कडे सोपवायच्या आणि त्याच नेटवर्कमधून हिरे दुबईला पाठवायचे.
‘कॅरेट-करॅट नेक्सस’ ऑपरेशन
डीआरआयने या कारवाईला ‘ऑपरेशन कॅरेट-करॅट नेक्सस’ असे नाव दिले आहे. विमानतळाच्या अंतर्गत प्रवेशाचा गैरफायदा घेत एकाच नेटवर्कमधून सोने भारतात आणणे आणि हिरे दुबईला पाठवणे, असा तस्करीचा प्रकार समोर आला आहे. डीआरआयकडून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार व तस्करीतून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे