

मुंबई : मुंबईतील 1 हजार 954 बांधकाम स्थळांपैकी 662 बांधकाम ठिकाणी हवा गुणवत्ता निरीक्षण उपकरणेच अद्याप बसवण्यात आली नसल्याचे मंगळवारी महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. प्रशासानाच्या या उपाययोजना पाहून खंडपीठाने मुंबईतील हवेची गुणवत्तेबाबत विचारणा केली. त्यावर पालिका प्रशासनाने मुंबईतील हवा मध्यम क्षेणीत असून हवा गुणवत्ता समाधानकारक असल्याचे सांगितले. यावर आंम्ही समाधानी नसल्याचे सांगत हायकोर्टाने पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील हवा गुणवत्तेबाबत उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. तर वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेच्यावतीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती सुमन श्याम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी मुख्य न्यायमूर्तीं चंद्रशेखर यांनी पालिकेला मुंबईतील आजच्या हवेबाबत विचारणा केली. त्यावेळी पालिकेचे ज्येष्ठ वकील एस.यू कामदार यांनी मुंबईची हवा आज मध्यम श्रेणीत असून समाधानकारक असल्याचे सांगताच खंडपिठाने आम्ही समाधानी नाही असे स्पष्ट केले.
दरम्यान, पालिकेच्यावतीने पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे मुख्य अभियंता अविनाश काळे यांनी अहवाल सादर केला. या अहवालात मुंबईतील 33.87 टक्के बांधकाम ठिकाणी सेन्सर-आधारित हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणारी उपकरणे अद्याप बसवण्यात आलेली नाहीत. 29 डिसेंबर 2025 ते 13 जानेवारीपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीदरम्यान, वायू प्रदूषण कमी करण्यासाठीच्या 28-कलमी मार्गदर्शक तत्त्वे आणि उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या बांधकाम स्थळांना सुमारे 409 कारणे दाखवा नोटिसा आणि 284 काम थांबवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर 7 कारणे दाखवा नोटिसा आणि 22 काम थांबवण्याच्या नोटिसा रद्द करण्यात आल्याची माहिती अहवालात देण्यात आली. डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी दरम्यान अनधिकृत बांधकाम आणि पाडकामाच्या कचरा टाकल्याबद्दल एकूण 13.47 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला असून बांधकाम व पाडकामाच्या डेब्रिजवर ताडपत्री न टाकल्याबद्दल 62 हजार 500 रुपये दंड म्हणून वसूल केला आहे. न्यायालयाने हा अहवाल दाखल करून घेत याचिकेची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र उपाययोजना राबवल्यानंतर ती नोटीस रद्द करण्यात आली. तसेच वांद्रे (पूर्व) येथील सरकारी कॉलनीतील पाडकामाची कामे, जी प्रस्तावित नवीन उच्च न्यायालयाच्या संकुलाची जागा आहे, त्या ठिकाणी नियमांचे पालन न केल्यामुळे 19 जानेवारी रोजी काम थांबवण्यात आले होते. कुलाबा येथील मॅजेस्टिक आमदार निवासाला जारी केलेली काम थांबवण्याची नोटीस, उपाययोजनांचे पालन न केल्यामुळे अजूनही कायम ठेवल्याचे अहवालत स्पष्ट केले आहे.
मुंबई : मुंबईचे हवामान सुधारलेले नाही. धारावी, चेंबूर, वडाळ्यामध्ये मंगळवारी एक्यूआय दोनशेपार गेला होता. त्यामुळे येथील नागरिकांना श्वास घेणही मुश्किल झाले होते. 151 ते 200 दरम्यानचा एक्यूआय आरोग्यासाठी घातक हवेची कॅटेगरीमध्ये मोडतो. मुंबईत सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मंगळवारी 182 वर पोहोचला होता. राजीव गांधी नगर, धारावी (211), स्वस्तिक पार्क चेंबूर (205), वडाळा पूर्व (203) तसेच त्याच भागातील वडाळा ट्रक टर्मिनस स्टेशन 1 आणि माउंट मेरी स्टेशन 2 मध्ये (200) सर्वाधिक प्रदूषण होते.
धारावी : 211
चेंबूर : 205
वडाळा पूर्व : 203
एचबी कॉलनी : 216
सायन स्टेशन : 194
शिवडी : 193
विलेपार्ले : 192
कुर्ला : 189