Mulund Crime News: जमिनीच्या वादातून खून; आरोपीस १७ वर्षांनी अटक; मुलुंड पोलीसांची टिटवाळ्यातील बनेली गावात कारवाई

१७ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा; मुलुंडमधील हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी टिटवाळ्यातून अटकेत
crime news
crime newsFile Photo
Published on: 
Updated on: 

मुलुंड: मूळ गावातील जमिनीच्या वादातून एका तरुणाची डोक्यावर हातोड्याने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आणि गेली तब्बल १७ वर्षे पोलिसांना चकवा देणाऱ्या मुख्य आरोपीला मुलुंड पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. फिरोज मोहम्मद सुलेमान शेख (वय ३९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, मुलुंड पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला टिटवाळा येथून बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, २० जून २००९ रोजी मुलुंड परिसरात मूळ गावातील जमिनीच्या जुन्या वादावरून फिरोज शेख, अफरोज शेख आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांनी मिळून मसकूर नावाच्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला होता.

crime news
Raj Thackeray BJP Criticism: सत्तेत आहात, मग मोर्चे कोणाविरुद्ध काढताय? राज ठाकरे यांचा भाजपला प्रश्न

या टोळीने मसकूरच्या डोक्यावर हातोड्याने गंभीर वार केले होते, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून मुख्य आरोपी फिरोज हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. तो सतत आपली ठिकाणे बदलत होता.

crime news
Mumbai Garbage Problem: कचरा टाकण्यावरून हायकोर्टाचे ताशेरे; महापालिका निवडणुका आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनांवर थेट सवाल

अखेर त्याने आपली खरी ओळख लपवून टिटवाळा पूर्व येथील बनेली गावात आश्रय घेतला होता. तिथे तो एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी 'फिटर' म्हणून काम करत जीवन कंठत होता.

मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लभडे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल महाजन आणि त्यांच्या विशेष शोध पथकाने या जुन्या प्रकरणाचा माग काढण्यास सुरुवात केली. गुप्तहेरांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, आरोपी टिटवाळ्यात नाव बदलून राहत असल्याचे पोलिसांना समजले.

खून खटल्याला मिळणार गती

अटकेनंतर पोलिसांनी आरोपी फिरोज शेख याला न्यायालयात हजर केले. १७ वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी आणि गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यातील फिरोज हा मुख्य आरोपी होता. यापूर्वी पोलिसांनी तपासादरम्यान त्याच्या काही साथीदारांना वेगवेगळ्या टप्प्यांवर ताब्यात घेतले होते. मात्र, मुख्य सूत्रधार फिरोज हा तब्बल १७ वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. त्याच्या अटकेमुळे आता या संपूर्ण खून खटल्याला गती मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.