

मुंबई: फक्त सत्ता येऊन चालत नाही, सत्ता अंगात असावी लागते. भाजप अजून विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडला नाही. तर काँग्रेसला विरोधी पक्ष कसा असतो हे आता आता कळायला लागले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-काँग्रेसला टोला लगावला. त्याचवेळी तुम्ही सत्तेत आहात ना, मग लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे कसले काढताय, अशी फटकारही सत्ताधारी भाजपला लगावली.
पु. ल. देशपांडे यांच्यावरील व्यंगचित्र दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. भाजपने मुंबईसह देशभरात लोकशाही वाचवा म्हणत काढलेल्या मोर्चाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, भाजपने लोकशाही वाचवा म्हणणे म्हणजे केएफसी चिकन या कंपनीचे प्रतीक असलेल्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा असे सांगण्यासारखे आहे.
स्वत:च सत्तेत बसलेले असताना लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चे नेमके कशासाठी आणि कोणाविरुद्ध काढत आहात, असे प्रश्न राज ठाकरे यांनी केले. भाजप अद्यापही विरोधी पक्षाच्याच मानसिकतेत आहे. तर काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका कशी बजवायची हे कळलेले नाही. आता आता त्यांना ते कळायला लागल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
सत्ताधाऱ्यांनी आपल्यावरील टीका आणि विनोद खिलाडूवृत्तीने स्वीकारायला शिकले पाहिजे. मात्र, आज व्यंगचित्रकार, पत्रकार आणि संपादकांवर बंधने आणली जात आहेत. हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हणाले.
बाळासाहेबांवर अनेक पत्रकार आणि संपादकांनी टीका केली, मात्र त्यांनी प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलेच असे नाही. टीका करणारा प्रत्येकजण आपला शत्रू नसतो, तर तो आपली भूमिका मांडत असतो, हे समजून घेण्याची गरज आहे.