

Bhojpuri Song On Marathi Lavani MNS Dahihandi Controversy: मुंबईतील वाकोला येथे मनसेच्या दहीहंडी कार्यक्रमातील एका अस्सल मराठी लावणीच्या व्हिडिओवर छेडछाड करत त्यावर भोजपुरी गाणे लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबईत राहणाऱ्या एका उत्तर प्रदेशमधील व्यक्तीने हा प्रताप केला असून, मूळ व्हिडिओ एडिट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, संबंधित व्यक्तीला चोप देत वाकोला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरातील मनसेच्या दहीहंडी कार्यक्रमाचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत होता. मात्र, उत्तर प्रदेशमधून मुंबईत येऊन राहणाऱ्या एका व्यक्तीने या मूळ व्हिडिओमधील मराठी लावणीचा ऑडिओ म्युट करून त्यावर भोजपुरी गाणे डकवले. हा एडिट केलेला व्हिडिओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला, ज्याला पाहतापाहता तब्बल १ दशलक्षाहून अधिक (1 Million+ Views) व्ह्यूज मिळाले.
या कृत्यामुळे मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि थेट महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान झाला आहे, असा संताप मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. हा प्रकार समोर येताच कलिना विधानसभा विभागाध्यक्ष संजय लक्ष्मण अडारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने सूत्रे हलवत संबंधित व्यक्तीचा शोध घेतला आणि त्याला जाब विचारण्यासाठी गाठले.
मनसे स्टाईलने जाब विचारत कार्यकर्त्यांनी त्या परप्रांतीय एडिटरला थेट वाकोला पोलीस ठाण्यात नेऊन ठेवले. या प्रकरणी मनसेच्या आक्रमक भूमिका आणि तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावर मराठी संस्कृतीची विडंबना करणाऱ्या अशा प्रवृत्तींना मनसेने दणका दिल्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.