Dahihandi Utsav
मुंबई : महाराष्ट्र सरकारने दहीहंडीला राज्य साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या निर्णयाला दहा वर्षे झाली. या कालावधीत गोविंदा पथकांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रो-गोविंदा लीग स्पर्धेमुळे दहीहडी उत्सव व्यावसायिक झाला आहे. दहीहंडी उत्सव ग्लोबल होण्यासाठी या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दहीहंडीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची भेट घेणार असल्याचे प्रो-गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने 10 वर्षांपूर्वी दहीहंडी खेळाला राज्य साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे सर्व दहीहंडी पथक आभारी आहोत. मात्र, हा मराठमोळा खेळ भविष्यात संपूर्ण देशभर खेळला जावा. तसेच त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाण्याच्या द़ृष्टीने दहीहंडीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी दहीहंडी शिष्टमंडळाकडून केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे करणार आहोत, असे सरनाईक म्हणाले.
दहीहंडी उत्सवाला सर्वप्रथम 12 ऑगस्ट 2015 रोजी साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय झाला होता. तत्कालीन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतला होता. तेव्हा विधानसभेत या निर्णयाला विरोध झाला होता. खेळाला मान्यता देताना त्याला नियमाच्या चौकटीत बसवणे, अटी तयार करणे असे ठरले होते. याबाबत अहवालही सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुढे काहीच घडले नाही. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शासकीय आदेश काढून दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाच्या चौकटीत बसवले, ही यामागील पार्श्वभूमी आहे.
प्रो-गोविंदा लीगच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव देशाच्या कानाकोपर्यात पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे पूर्वेश सरनाईक यांनी म्हटले. यंदा प्रो-गोविंदा लीगचा तिसरा हंगाम आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या लीगच्या निवड चाचणी स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी आम्ही स्पेनमधील गोविंदा पथकांना निमंत्रित करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यभरातील गोविंदा पथकांनीही दहीहंडीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळावा, या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रीय खेळाची मान्यता मिळाल्यास खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळेल. कायमस्वरूपी नोकर्या मिळतील. त्यामुळे अधिकाधिक युवा वर्ग या खेळाकडे आकर्षित होईल, असे समन्वय समितीच्या पदाधिकार्यांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारने साहसी दर्जा दिल्यापासून दहीहंडी खेळात गोविंदा पथकांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने विमा कवचाची गरजही वाढली आहे. गेल्या वर्षी सव्वा लाख गोविंदांना विमा कवच दिले होते. यंदा राज्यभरातील दीड लाख गोविंदांचा विमा उतरविला जाणार आहे. त्यासाठीचा प्रीमियम सरकार भरेल, अशी घोषणा सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी पावसाळी अधिवेशनात केली. या योजनेसाठी सुमारे 1.25 कोटींचा निधी क्रीडा विकास निधीतून दिला जाणार असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. गोविंदा पथकांना विमा कवच देण्याची मागणी भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी केली होती.