

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विधान परिषदेत घोषणा
एमएमआर क्षेत्रातील सरकारी कार्यालयांतील महिलांना मिळणार 30 मिनिटांची सवलत
महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर
‘कम अर्ली, गो अर्ली’ या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9.15 ते 9.45 यादरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील, तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची, म्हणजेच सुमारे 30 मिनिटांची सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांना ‘लवकर या, लवकर जा’ संकल्पनेंतर्गत कार्यालयांत लवकर येऊन काम केल्यास संध्याकाळी 30 मिनिटे लवकर निघण्याची सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.
याशिवाय केंद्राच्या धर्तीवर 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आली असून, प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास एक वर्षापर्यंत अर्धवेतन रजा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी घोषित केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान अनेक आमदारांनी महिलांच्या समस्या मांडत त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंगळवारी या चर्चेला उत्तर देताना वरील घोषणा केल्या.
जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि महाराणी ताराबाई यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याचा संकल्प सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवार यांनी ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, /..2सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी
‘अन्नपूर्णा’, ‘लखपती दीदी’ यासारख्या योजनांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद मॉल’, ‘उमेद मार्ट’ आणि ‘महालक्ष्मी सरस’ यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गटांची उत्पादने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. राज्यातील 17 हजार 254 अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्याची माहितीही सुनेत्रा पवार यांनी दिली.
महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे सांगत हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेंतर्गत जुलै 2015 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत 14 मोहिमा राबवून 42 हजार 594 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच, ‘ऑपरेशन शोध’मोहिमेतून 5 हजार 66 महिला आणि 2 हजार 771 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘मिसिंग सेल’ कार्यरत असून, महिलांच्या समस्यांसाठी 51 ‘भरोसा सेल’ कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे सांगितले.
भाषणाच्या ओघात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार यांना गहिवरून आले. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील महिलांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम केले होते. अर्थमंत्री म्हणून यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू होती. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते आणि ते आपल्यातून कायमचे निघून गेले, असे सांगत अजित पवारांच्या आठवणींनी भावुक झालेल्या सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला आणि संपूर्ण सभागृह भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाषणाच्या शेवटी ‘अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर; आधी हाताला चटका, मग मिळते भाकर,’ या ओळींचा उल्लेख करत स्त्रीच्या सहनशीलतेत आणि कष्टात समाज परिवर्तनाची ताकद दडलेली आहे, असे सांगत महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडविण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यात चौथे महिला धोरण लागू करण्यात आले असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावे, यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत असून, बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गाव निर्माण करणे आणि मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, कौशल्यविकास, बचत गटांचे बळकटीकरण, महिला शेतकरी व कामगारांसाठी विशेष उपाययोजना तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी यावर राज्य सरकारचा विशेष भर असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.