

मुंबई : मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, एलपीजी आणि एलएनजी गॅसचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. या परिस्थितीचा परिणाम उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि सामान्य नागरिकांवर एकाच वेळी होताना दिसत आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, नाशिक, अकोल्यातही गॅस तुटवड्यामुळे नागरिक, व्यावसायिक चिंतेत आहेत. संभाजीनगरातील सुमारे 90 टक्के उद्योद बंद होण्याच्या मार्गावर असून, नाशिक जिल्ह्यातील निम्मे उद्योग गॅसअभावी बंद पडले आहेत.
गॅस टंचाईचा परिणाम मुंबईतील हॉटेल उद्योगावरही दिसू लागला आहे. आहार म्हणजेच असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट या संघटनेच्या माहितीनुसार, गॅसच्या कमतरतेमुळे शहरातील जवळपास 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर एलपीजी आणि कमर्शियल गॅसवर अवलंबून असल्याने हा तुटवडा गंभीर मानला जात आहे. सध्या अनेक हॉटेल्सकडे फक्त दोन दिवस पुरेल एवढाच गॅससाठा उरला आहे. पुढील तीन दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मुंबईतील सुमारे 50 टक्के हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील अर्धे उद्योग बंद
नाशिक : गॅस पुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आल्याने, सातपूर, अंबड या प्रमुख औद्योगिक वसाहतींसह जिल्ह्यातील 50 टक्के उद्योग बंद पडले आहेत. तर जे उद्योग सुरू आहेत, त्यांच्याकडे 24 तास पुरेल इतकाच एलपीजी गॅस शिल्लक असल्याने, पुढच्या काही तासात ते देखील बंद पडणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यात सर्वाधिक झळ लघु उद्योगांना बसली असून, लाखो कामगारांचे रोजगार धोक्यात आले आहेत. सूक्ष्म उद्योगांना दररोज 100 ते 200 किलो, मध्यम उद्योगांना दीड टन आणि मोठ्या उद्योगांना फरनेससाठी अधिक प्रमाणात गॅस लागत असल्याने, हे उद्योग अडचणीत आले आहेत. अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील सुमारे 300 ते 400 पावडर कोटिंगचे युनिट एलपीजी गॅसअभावी बंद पडले आहेत.
सोलापुरातील अडीच हजार हॉटेल गॅस टाक्यांअभावी बंद पडणार
सोलापूर : शहरातील तब्बल अडीच हजार हॉटेल बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यास सोलापूर हॉटेल व्यावसायिक असोसिएशने दुजोरा दिला आहे. शहरातील हॉटेल व्यवसायाला त्याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. शासनाकडून व्यावसायिक गॅस टाक्या पुरवठ्यावर निर्बंध आणण्याचे निर्देश गॅस पुरवठा कंपन्यांना देण्यात आल्याने शहरातील पुरवठादारांनी व्यावसायिक गॅस टाक्यांचा पुरवठा तात्पुरता बंद केला.