

Mira Road Cyber Crime News
मिरा रोड : मॅट्रीमोनिअल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून त्यांना ट्रेडिंगच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा मिरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात रोशनकुमार शेट्टी, साबिरखान, सनद दास, राहुलकुमार उर्फ कैलाश राकेशकुमार, आमिर करम शेरखान, अभिषेक अनिल नारकर उर्फ गोपाल व मोहम्मद रशिद फकीर मोहम्मद बलोच उर्फ लक्की अशा आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी तब्बल 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील बापाने गाव परिसरात लॉजिंग अँड बोर्डिंग येथे 12 नोव्हेंबर रोजी काही व्यक्ती ऑनलाईन फ्रॉडचे पैसे बेकायदेशीर मार्गाने स्वतःच्या खात्यात घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले.
आपसात संगनमत करून ऑनलाईन फ्रॉडचे पैसे अवैध मार्गाने स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारून तसेच हे पैसे स्वीकारण्यासाठी इतर काही बँक खाती उपलब्ध करून दिले. तसेच अवैध मार्गाने प्राप्त झालेल्या पैशाचा गैरवापर करुन शासनाचा कर बुडवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील पीडित साक्षीदार यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात, साक्षीदारांना विविध मॅट्रीमोनिअल साईट तसेच इतर सोशल मिडिया साईटवरून संपर्क करण्यात आला होता. तसेच त्यांचा विश्वास संपादन करत मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी बोगस/बनावट वेबसाईटची लिंक पाठवण्यात आली होती. त्यामध्ये ऑनलाईन फॉरेस्क ट्रेडिंग व गोल्ड ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणुकीसाठी विविध बँक खाती देण्यात आली होती. त्यामध्ये पैसे भरण्यास सांगून करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.