

Manoj Jarange Patil
मुंबई: मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज आपले उपोषण सोडले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, बीडमधील पाटोदा येथे झालेल्या चर्चेत सरकारला जरांगे यांची मनधरणी करण्यात यश आले. सरकारने शब्द दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडलं, मात्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज २० वा दिवस होता. कालच त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर जाण्यावर ठाम असल्याची आक्रमक भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष सरकार आणि त्यांच्यातील या बैठकीकडे लागले होते. आज पाहाटे ६ च्या सुमारास पाटोदा (जि. बीड) येथे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत माहिती दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विनंतीनुसार हे उपोषण सोडण्यात आले असून, येणाऱ्या ९० दिवसांत मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पूर्ण करू असे अश्वासन दिले आहे.
माध्यमांसमोर खुली चर्चा
ही चर्चा अत्यंत महत्त्वाची असल्याने ती बंद दाराआड न करता, सर्वांसमोर आणि माध्यमांच्या उपस्थितीतच पार पाडावी, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतली होती. त्यांची हीच अट मान्य करत उपस्थितांसमोर आणि मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोरच सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळात कोण-कोण होते सामील?
मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी आणि मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारचे विशेष शिष्टमंडळ आज पाहाटेच दाखल झाले होते. यामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.