

Maharashtra Weather Update
कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रासाठी २५ ते २९ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या घाट क्षेत्रांतील काही ठिकाणी पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने वर्तवली आहे.
रायगडसाठी २९ जून रोजी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २७ ते २९ जून दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी २५ ते २८ जून दरम्यान आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी २५ ते २६ जून दरम्यान यलो अलर्ट दिला आहे.
पालघर, ठाणे, मुंबईतील काही भागात २७ ते २९ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहणार असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.