

Maharashtra Weather Update
पुढील २ ते ३ दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी ऑरेंज अर्लट राहील, तर या दोन जिल्ह्यांत २५ ते २७ जून दरम्यान मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला २३ जून रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर येथे यानंतरच्या पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यांतील काही भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथेही यलो अलर्ट दिला आहे. पालघर जिल्ह्यांसाठी २४ ते २५ जून दरम्यान यलो अलर्ट राहणार असल्याचे हवामान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रातही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रासाठी २३ जून रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर येथे २४ ते २७ जून दरम्यान यलो अलर्ट दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रातही पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस राहणार असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. येथे प्रतितास ३०-४० किमी वेगाने वारे वाहू शकते.
मान्सूनने (Southwest monsoon) जयपूर, आग्रा, डेहराडून, शिमला, पठाणकोट, जम्मूपर्यंत धडक दिली आहे. तर पुढील दोन दिवसांत राजस्थान, हरियाणाचा काही भाग, पंजाब, चंदीगड आणि दिल्लीत पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. सामान्यपणे मान्सून दिल्लीत ३० जूनपर्यंत पोहोचतो. पण यंदा तो यंदा लवकर दाखल होत आहे.